बलुचिस्तानातील नेते अकबर बुगती हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांचा नजरकैदेतून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असा दावा त्यांच्या वकिलांनी बुधवारी केला.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो हत्येप्रकरणी आणि २००७ मध्ये आणीबाणी लादल्याप्रकरणी मुशर्रफ यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. बुगती हत्येप्रकरणी त्यांना जामीन मिळाल्याने या अखेरच्या प्रकरणातही त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुशर्रफ सध्या नजरकैदेत असले तरी त्यामधून बाहेर पडण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे, असेही त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
बुगती हत्येप्रकरणात त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, मात्र आता त्या प्रकरणातही त्यांना जामीन मंजूर झाल्याने मुशर्रफ आता मुक्त झाले आहेत, असे इलियास सिद्दिकी या त्यांच्या वकिलांनी सांगितले.
मुशर्रफ यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन मंजूर झाला असला तरीही ते देश सोडून जाणार नाहीत, असे पाकिस्तान मुस्लीम लीगच्या प्रवक्त्या आसिया इशाक यांनी सांगितले. ते पाकिस्तानातच राहणार असून राजकीय उद्देशाने दाखल करण्यात आलेल्या खटल्यांचा मुकाबला करणार आहेत, असेही इशाक यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना बुगती हत्येप्रकरणात जामीन मंजूर केला आहे. तीनसदस्यीय पीठाने प्रत्येकी एक दशलक्ष रुपयांच्या दोन हमीपत्रांवर मुशर्रफ यांना जामीन मंजूर केला आहे.
बलुचिस्तान उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुशर्रफ यांचा हात असल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही आणि आमच्यासाठी हीच बाब महत्त्वाची आहे, असे पीठाने सांगितले.