सध्या भारतात १६व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असतानाच पाकिस्तानातही याचे पडसाद उमटू लागले आहेत.
भारतातील निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भविष्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत गुरुवारी सविस्तर चर्चा करण्यात आली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा आढावा घेण्याबरोबरच सध्या भारतात सुरू असलेल्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
लोकप्रतिनिधी आणि लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही देशातील सर्वोच्च समिती आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या बैठकीला पंतप्रधानांसह संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्करप्रमुख, नौदलप्रमुख तसेच सुरक्षाविषयक  खात्यांचे प्रमुखही उपस्थित होते.
गुरुवारच्या बैठकीत अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीत भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा मुद्दाही ठळकपणे चर्चिला गेला. गेल्यावर्षी ऑगस्टमध्येही झालेल्या विशेष बैठकीत आंतरराष्ट्रीय सीमेवरील तणावाच्या पाश्र्वभूमीवर भारताला केंद्रित ठेवून चर्चा झाल्याचे समजते.