उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानी समर्थकांचा हात असल्याचा आरोप भाजपा खासदार विनय कटियार यांनी केला आहे. पाकिस्तानचे काही समर्थक तिरंग्याचा अपमान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांनीच कासगंज येथे हिंसाचार घडवून आणल्याचे कटियार यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची सत्ता आल्यापासून पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. कासगंजची घटना खूपच दुर्देवी आहे. कासगंजमध्ये यापूर्वी नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध असल्यामुळे कधीच जातीय दंगली घडल्या नव्हत्या. मात्र, आताच्या घटनेनंतर पाकिस्तानशी लागेबांधे असणाऱ्या काही समाजकंटकांची नावे पुढे आली आहेत. हे समाजकंटक तिरंग्याचा अपमान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या समाजकंटकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे सरकारने अशा लोकांशी सक्तीने वागणे गरजेचे आहे, असे विनय कटियार यांनी सांगितले.

‘मुस्लीमबहुल विभागात पाकविरोधी घोषणाबाजी कशासाठी?’

उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे प्रजासत्ताक दिनी तिरंगा रॅलीच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी दोन गटांत हिंसाचार झाला होता. जमावाच्या गोळीबारात चंदन गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कासगंजमधील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. योगी सरकारने हिंसाचारात जीव गमावणाऱ्या चंदन गुप्ताच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, चंदन गुप्ताच्या आईने ही मदत नाकारली आहे. आम्हाला आर्थिक मदत नको, माझ्या मुलाला शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. कासगंजमधील हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात तीन दुकाने, एक बस आणि कार जाळण्यात आली होती.

कासगंजमधील हिंसाचार उत्तर प्रदेशवरील कलंक