नास्तिक स्वरूपाच्या लोकशाहीला आमचा ठाम विरोध असल्याचे नमूद करून पाकिस्तान तालिबानने शनिवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवणुकीदरम्यान जोरदार हल्ले चढविण्याचा इशारा दिला आहे. हाराकिरी पथकांचा वापरही करण्यात येणार असल्याचे पाकिस्तान तालिबानने म्हटले आहे.
तेहरिक-ए-तालिबानचा प्रमुख हकीमुल्लाह मेहसूद याने दहशतवाद्यांच्या कमांडरना लिहिलेल्या पत्रातून शनिवारी देशभर हल्ले चढविण्याचे आदेश दिले आहेत. खैबर पख्तुनवा आणि बलुचिस्तान येथील हल्ले आपण स्वत: करणार आहोत तर पंजाब आणि सिंध प्रांतात तुम्ही हल्ले चढवा, असा आदेश मेहसूदने कमांडरना दिला आहे.
नास्तिक स्वरूपाच्या लोकशाहीला आमचा विरोध आहे, अशी पद्धत आम्ही स्वीकारू शकत नाही. निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांना लक्ष्य करा. कारण तेच नास्तिक पद्धतीच्या लोकशाहीचे हस्तक आहेत, असे मेहसूद याने म्हटले आहे. हल्ल्यांची यादी आणि त्याची पद्धत कशी असावी या बाबतचे मार्गदर्शन आपण करीत आहोत आणि हाराकिरी पथकांचे काम काय असेल त्याबाबतही आदेश देत आहोत, असे मेहसूद याने म्हटले आहे.
सार्वत्रिक निवडणुका उधळून आपल्या गटाला लोकशाहीच उधळून लावायची असल्याचे मेहसूदने यापूर्वी मीडियाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने यापूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवामी नॅशनल पार्टी आणि मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेण्ट या पक्षांच्या सभांवर हल्ले चढविले आहेत. तथापि, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि इम्रान खान यांच्या पक्षाच्या सभांवर हल्ले चढविण्यात आलेले नाहीत.