पाकिस्तान सरकारने २०१०सालच्या उन्हाळ्यात ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेशी छुपा करार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मागील महिन्यात न्यूयॉर्क येथील न्यायालयात एका खटल्यादरम्यान सरकारी वकिलांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून ही बाब उघड झाली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधु आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तहेर संस्थेच्या मदतीने ‘अल-कायदा’ संघटनेशी शांतता करार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती या कागदपत्रांमध्ये आहे. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला त्याच्या अबोटाबाद येथील घरात घुसून मारताना केलेल्या कारवाईत अमेरिकी सैन्याच्या हाती काही कागदपत्रे लागली होती. त्यावरून पाकिस्तान सरकारने ‘अल-कायदा’चा तिसऱ्या क्रमांकाचा नेता अल-मसरी याच्याशी संपर्क साधल्याचे उघड झाले. या कागदपत्रांनूसार, २०१०च्या उन्हाळ्यात ही बोलणी सुरू होती. शाहबाज शरीफ यांनी ‘अल-कायदा’शी शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी संपर्क साधला होता. पाकिस्तानच्या हद्दीतील पंजाब प्रांतात अल-कायदा कोणत्याही दहशतवादी कारवाया करणार नाही, या अटीवर पाकिस्तानी सरकार हा करार करण्यास तयार असल्याचे अल-कायदाचा व्यवस्थापक अब्द अल-रहमान याने ओसमा बिन लादेनला सांगितल्याची माहिती कागदपत्रांमध्ये आहे. याच काळात अल-कायदा भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट आखत होती.
न्यूयॉर्क येथील न्यायालयात सध्या अबिद नसीर या ब्रिटीश नागरिकाविरुद्ध खटला सुरू असून या खटल्याच्या कारवाईदरम्यान, सरकारी वकिलांकडून ही कागदपत्रे सादर करण्यात आली. नासीर याच्यावर मँचेस्टर आणि न्यूयॉर्क शहरांमध्ये मोठ्याप्रमाणावरील घातपाती कारवाया घडवून आणण्याचा कट आखणे आणि दहशतवादी संघटना चालविण्याचा आरोप आहे. सन २०१३मध्ये त्याला ब्रिटनकडून अमेरिकेच्या हवाली करण्यात आले होते.