पाकिस्तानी लष्कर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करते आहे. असे वागून ते गंभीर चूक करीत आहेत. त्यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देण्याची आम्ही क्षमता राखून आहोत. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, तुम्हाला महागात पडेल..’ अशा स्पष्ट शब्दांत भारतीय लष्कराने पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानच्या कुरापतींमुळे उभय देशांतील शस्त्रसंधी धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
जानेवारीपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उच्छाद मांडला आहे. वारंवार भारतीय चौक्यांवर हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या सीमा कृती दलाने (बॅट) दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी म्हणून हा खेळ रचला आहे. मात्र, आता या उच्छादाला तेवढय़ाच जोरदार प्रत्युत्तर देण्याचा चंग भारतीय लष्कराने बांधला आहे. लष्कराच्या २५ इन्फन्ट्री विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल व्ही. पी. सिंग यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानी लष्कराला कडक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, ‘३०० दहशतवादी सीमा ओलांडून भारतात घुसण्यासाठी तत्पर आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठीच पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या कारवायांना सडेतोड उत्तर देण्याची मुभा संरक्षणमंत्री व लष्करप्रमुखांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आक्रमकांवर कठोर कारवाई केली जाईल. हा लष्करी मामला असून जेव्हा आम्ही त्यांच्या कारवायांना पूर्ण शक्तिनिशी उत्तर देऊ त्यावेळी तुम्ही पाहालच..’
पुन्हा उल्लंघन
भारताने ठणकावल्यानंतरही पाकिस्तानच्या कारवायांना लगाम बसललेला नाहीच. रविवारी दुपारी पुन्हा पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूँछ जिल्ह्य़ातील मेंढार भागात लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. भारतानेही त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले. शनिवारी रात्रीही कृष्णाघाटी, बालाकोट आणि हमीरपूर भागात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता.
आतापर्यंत ७० वेळा
पाकिस्तानी लष्कराने जानेवारीपासून आतापर्यंत ७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यात सात भारतीय जवान शहीद झाले आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून शस्त्रसंधीचे तब्बल १४ वेळा उल्लंघन झाले आहे. तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने २००३ मध्ये पाकिस्तानशी शस्त्रसंधी केली होती.
आणखी हल्ले?
पाकिस्तानकडून आणखी हल्ले होण्याची शक्यता पूँछ जिल्ह्य़ातील १२० इन्फन्ट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर ए. सेनगुप्ता यांनी बोलून दाखवली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींची माहितीही  आमच्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.