नोटाबंदीला जवळपास तीन वर्षे उलटले असताना आता पाकिस्तान नव्या बनावट नोटांद्वारे भारताला आर्थिक नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, २०१६ च्या अगोदरपासून ज्या प्रकारे पाकिस्तानातून मोठ्याप्रमाणवर बनावट नोटा त्यांच्या टोळ्यांसह अन्यमार्गांद्वारे भारतात पोहचवल्या जात होत्या, त्याच मार्गांचा वापर करून पाकिस्तान भारतात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब ही आहे , नेपाळ, बांगलादेश आणि अन्य देशांमध्ये बनावट भारतीय नोटा आणण्यासाठी व वितरणासाठी पाकिस्तान राजकीय माध्यमांचा देखील दुरुपयोग करत आलेला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयने आता अगोदरच्या बनावट नोटांच्या तुलनेत, अधिक उत्कृष्ट प्रकारे बनावट नोटांची छपाई करण्याची कला अवगत केली आहे. ज्यामुळे भारतात या बनावट नोटा पसरवणे अधिक सोयीचे व्हावे असा त्यांचा मानस आहे.

एवढेच नाहीतर भारतात व्यवहारात वापरात असलेल्या नव्या नोटांप्रमाणे हुबेहुब बनावट नोटा तयार करून, पाकिस्तानकडून त्या लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद या सारख्या दहशतवादी संघटनांना त्या पुरवल्या जात आहेत. तपासात असे देखील दिसून आले आहे की, कराची येथील ‘मलीर-हाल्ट’ भागातील पाकिस्तानच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांमध्ये प्रथमच ‘ऑप्टिकल वेरियबल इंक’चा वापर केला जात आहे. जी दोन हजार रुपयांच्या नोटेच्या धाग्यात वापरली जाते. या रंगाचे वैशिष्ट्य असे आहे की, नोटेवर ती हिरव्या रंगात दिसते, तर नोटेची दिशा बदलल्यास तिचा रंग निळा होतो.

बनावट नोटा भारतात पोहचवण्यासाठी पाकिस्तान विविध मार्गांचा अवलंब करत आहे. २२ सप्टेंबर रोजी खलिस्तान समर्थक असलेल्या खलिस्तान जिंदाबाद फोर्सकडून तब्बल १ कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. याशिवाय यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून पाच एके – 47 रायफल्स, ३० – बोर पिस्तुल, ९ – हॅण्ड ग्रेनेड, ५ – सॅटेलाइट फोन, दोन मोबाइल देखील जप्त केले होते. हे सर्व पाकिस्तानी ड्रोनच्या सहाय्याने पोहचवल्या गेले होते.

२५ सप्टेंबर रोजी ढाका येथून पोलिसांनी बनावट नोटा जप्त केल्या होत्या. दुबईतील सलमान शेरा या व्यक्तीने हे पार्सल बांगलादेशामधील सीलहट येथे पाठवले होते. तपासात असे समोर आले होते की, हे पार्सल सीलहट येथून श्रीनगर येथे पोहचवले जाणार होते. शिवाय, सलमान शेरा हा पाकिस्तानच्या आयएसआयशी निगडीत असलेल्या कुख्यात असलम शेराचा मुलगा आहे, हे देखील चौकशीत झाले होते. असलम हा ९० च्या दशकापासून बनावट नोटांच्या कारभारात आहे. याचबरोबर २०१९ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डी-कंपनीचा हस्तक युनूस अन्सारीला तीन पाकिस्तानी नागिराकांबरोबर जवळपास आठ कोटींच्या बनावट नोटा घेऊन जाताना अटक केली होती.