एकीकडे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे समपदस्थ नरेंद्र मोदी यांच्याशी सहकार्याची भाषा केली असतानाच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पूँछ क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
श्रीनगर येथे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी असे सांगितले, की संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या पहिल्याच भेटीच्या मुहूर्तावर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
संरक्षणमंत्री जेटली सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या भेटीवर येत असताना पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी तुकडय़ांनी ८१ मि.मी.च्या उखळी तोफांचा मारा भीमबेर गली केरी-मेढर भागात केला. सकाळी साडेसात वाजता त्यांनी छावणीवर तोफगोळ्यांचा मारा केला, असे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सीमेवरील तीन भागात या चकमकी झाल्या. राजौरी व पूँछ भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून तेथे तोफगोळे पडले असून तो नागरी वस्तीचा भाग आहे. यात काही गाई गुरे मारली गेली आहेत, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
पूँछ जिल्ह्य़ात अलिकडेच एका स्फोटात एक जवान धारातीर्थी पडला होता तर तीन जण जखमी झाले. एप्रिल अखेर ते मे मध्यावधीपर्यंत प्रत्यक्ष ताबा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. २०१३ मध्ये त्या १२ जवान मारले गेले तर ४१ जण जखमी झाले. पाकिस्तानी सैन्याने आतापर्यंत १४९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय सैन्याची गस्त सीमेवर चालू आहे.