सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या ईदच्या दिवशीही नापाक हरकती सुरुच आहेत. शनिवारी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. नौशेरामध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात विकास गुरुंग हा जवान शहीद झाला.

गुरुंग अवघ्या २१ वर्षांचा होता. गोळीबारात जखमी झालेल्या गुरुंगचे काहीवेळाने निधन झाले. तो मूळचा मणिपूरचा आहे. नौशेरामध्ये भारतीय लष्कराचे जवान गस्तीवर असताना पाकिस्तानने मोर्टार हल्ला केला. त्यामध्ये विकास गुरुंग शहीद झाला. पाकिस्तानने मोर्टार डागून नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.

बुधवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान शहीद झाले.तर तीन जवान यात गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवरील सांबा जिल्ह्यातील रामगढ आणि चंबलीयाल या भागांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने या भागांमध्ये भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. बुधवारी पहाटेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच होता. चंबलीयाल येथे बीएसएफचे चार जवान पाकच्या गोळीबारात शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले.