पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी २०१८ च्या निवडणुकीत लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदसोबत ‘युती’ करण्याची तयारी सुरु केली आहे. हाफिज सईदसोबत निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मुशर्रफ यांनी हे विधान केले. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी, आपण लष्कर-ए-तोयबाचा सर्वात मोठा समर्थक असल्याचे म्हटले होते.

‘आज’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘आतापर्यंत त्या लोकांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र ते जर युतीचा भाग होणार असतील, तर मी त्यांचे स्वागत करेन,’ असे मुशर्रफ यांनी म्हटले. गेल्या महिन्यात मुशर्रफ यांनी एका मोठ्या युतीची घोषणा केली होती. त्यामध्ये सुन्नी तहरीक, मजलिस-ए-वहातुदुल मुसलिमीन, पाकिस्तान अवामी तहरीक आणि मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगसह दोन डझन पक्षांचा समावेश होता. मात्र मुशर्रफ यांच्या घोषणेनंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी अनेक बड्या पक्षांनी या महायुतीमधून अंग काढून घेतले.

गेल्या आठवड्यापूर्वी हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका झाली. यानंतर लगेचच त्याने २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. मात्र हाफिजने तो नेमका कुठून निवडणूक लढणार, याबद्दल भाष्य केले नाही. जमात-उद-दावाने ऑगस्ट महिन्यात मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची आठवड्याभरापूर्वी न्यायालयाने नजरकैदेतून मुक्तता केली. हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी पाकिस्तान सरकारने केली होती. मात्र पुराव्यांअभावी त्याची नजरकैदेतून सुटका झाली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिजला अमेरिकेने दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.