‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या संपादकीयामधील मत
पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणामुळे अनेकदा अमेरिकेच्या नाकी नऊ आले असून त्या देशाबरोबरील संबंध कायमच धोकादायक राहिले आहेत. आता पाकिस्तानच्या कारवायांना आवर घालण्याची वेळ आली आहे, असे मत अमेरिकेतील ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने शुक्रवारच्या संपादकीयमधून व्यक्त केले आहे.
‘टाइम टू पुट द स्क्वीझ ऑन पाकिस्तान’ या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयमध्ये या वृत्तपत्राने म्हटले आहे की, अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे उलटली तरी अफगाणिस्तानमधील संघर्ष चिघळतच असून त्याची मोठी जबाबदारी पाकिस्तानवर आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली ३३ अब्ज डॉलरची मदत आणि त्या देशाबरोबरील संबंध सुधारण्यासाठी वारंवार केलेल्या प्रयत्नांनंतरही पाकिस्तान अमेरिका आणि अफगाणिस्तानसाठी एक दुटप्पी आणि धोकादायक भागीदार राहिला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत पाकिस्तानी लष्करावर अधिक नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांना जोर आला आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तहेर संघटनांनी पाकिस्तानचे अफागाणिस्तानमधील हितसंबंध जपण्यासाठी आणि तेथील भारतीय हितसंबंधांना पायबंद घालण्यासाठी तालिबान व हक्कानी नेटवर्कचा वापर केला आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानी लष्कराने नुकतीच तालिबानविरोधी मोहीम राबवली, मात्र हक्कानी नेटवर्कला अद्याप पाकिस्तानमध्ये रान मोकळेच आहे, असेही ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. अमेरिकी करदात्यांच्या पैशातून पाकिस्तानला मदत म्हणून एफ-१६ लढाऊ विमाने देण्याच्या निर्णयाला सिनेटर बॉब कॉर्कर यांनी केलेल्या विरोधाचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने कौतुक केले आहे. कॉर्कर यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तान आणि तेथील अमेरिकी सैनिकांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून त्याच्या कारवायांवर जर पाकिस्तानने नियंत्रण आणले तर पाकिस्तानच्या मदतीबाबत फेरविचार होऊ शकतो.
मात्र पाकिस्तानशी पूर्णपणे संबंध तोडणे सध्या हितावह नाही, असे मत ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मांडले आहे. पाकिस्तानकडे दक्षिण आशियातील सर्वात वेगाने वाढत असलेला अण्वस्त्रसाठा आहे.
तो दहशतवाद्यांच्या हाती पडू नये यासाठी अमेरिकेने पाकिस्तानशी चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद करून चालणार नाही, असेही या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

‘एफ १६’ विमाने नाकारल्याने संबंधात दुरावा
इस्लामाबाद : पाकिस्तानला एफ १६ विमाने नाकारण्यात आल्याने अमेरिकेबरोबरच्या संबंधांना ओहोटी लागली आहे. अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला लष्करी मदतीअंतर्गत ही विमाने देण्यास नकार दिल्याने त्याचा वाईट परिणाम दोन्ही देशांतील संबंधावर झाल्याची कबुली पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या सिनेटमध्ये बोलताना अझीझ यांनी सांगितले, की गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तान-अमेरिका संबंध तणावाच्या सावटाखाली आहेत, त्याला कारण एफ १६ विमाने पाकिस्तानला देण्यास अमेरिकेने असमर्थता दर्शवली आहे. अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला एफ १६ विमाने लष्करी मदतीपोटी देण्यास विरोध केला. त्यामुळे अनुदानित दरात ही विमाने पाकिस्तानला मिळण्याची शक्यता मावळली आहे. भारतामुळेही हा परिणाम झाला असल्याचे अझीझ यांनी तीनदा त्यांच्या भाषणात सांगितले. भारतीय दबाव गटाने पाकिस्तानला एफ १६ विमाने देण्याचा निर्णय अमेरिकेला फिरवायला लावला, सिनेटर रँड पॉल यांच्या ठरावाच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला मिळणारी एफ १६ विमाने रोखली आहेत.