पाकिस्तानमधील कराची शहरात शुक्रवारी मानवाधिकार कायद्यासाठी लढणाऱ्या आणि सामाजिक कार्यकर्त्या सबीन मेहमूद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री सबीन या कराची रेस्टॉरंटमधून आपल्या आईसह बाहेर पडल्या आणि गाडीत जाऊन बसल्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात बंदुकधारी व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला.  त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतचं त्या मृत पावल्या. डॉक्टरांनी त्यांच्या शरिरात पाच गोळ्या काढल्या. दरम्यान, त्यांच्या आईची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील राजकारणाबद्दल आयोजित कार्यक्रमाचे सबीन मेहमूद यांनी सूत्रसंचालन केले होते. बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा रक्षकांकडून फुटीरतावाद्यांवर असंवैधानिकरित्या कृत्ये करण्यात येत असल्याचा, मानवाधिकार संघटनेचा आरोप आहे. याच कारणावरून त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.