संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) मध्य पूर्वबाबतची चर्चा सुरू असताना पाकिस्तानच्या राजदूतांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅण्टोनिओ ग्युटर्स यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीर मुद्दा उपस्थित केला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी मध्य पूर्वेतील अस्थिर स्थितीबाबत चर्चा सुरू असताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला, मात्र लोधी यांना नेहमीप्रमाणे कोणीही पाठिंबा दिला नाही. पॅलेस्टाइनच्या नागरिकांच्या कायदेशीर अपेक्षांना पाकिस्तानचा पाठिंबा कायम असेल, असे सांगताना लोधी यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

संयुक्त राष्ट्रसंघाने आपली जबाबदारी ओळखून पॅलेस्टाइनबाबत स्वत:च केलेल्या ठरावांची अंमलबजावणी कशी होईल ते पाहावे, त्याचप्रमाणे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या काश्मीरच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, तसे झाल्यास जगातील जनतेचा संयुक्त राष्ट्रसंघावरील विश्वास उडणार नाही, असे लोधी म्हणाल्या.

त्यापूर्वी, काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावली आणि भारत व पाकिस्तानने दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न चर्चेद्वारे सोडवावे, असे स्पष्ट केले.