दिल्लीहून पाकिस्तानच्या विमानांच्या उड्डाणांमध्ये अडचणी येत असल्याच्या वृत्ताचे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने (पीआयए) खंडन केले आहे. फॉरेक्स कायद्याचे उल्लंघन केल्याने भारतीय अधिकाऱ्यांनी एअरलाइन्सवर समन्स बजावले होते, त्यानंतर हे खंडन करण्यात आले आहे.
पीआयएने कार्यालयासाठी दिल्लीत बेकायदेशीरपणे एक इमारत खरेदी केल्याचा ठपका भारतीय अधिकाऱ्यांनी ठेवल्याने पाकिस्तानला दिल्लीतून आपल्या विमानांचे उड्डाण खंडित करावे लागणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.
तथापि, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर पीआयएने २००५ मध्ये आपल्या कार्यालयासाठी दिल्लीत एक मालमत्ता खरेदी केली, असे एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.दरम्यान, जवळपास नऊ वर्षांनंतर रिझव्‍‌र्ह बँकेने या मालमत्ता खरेदीला हरकत घेतली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीविनाच ही खरेदी करण्यात आल्याचे बँकेचे म्हणणे आहे.