अनेकदा आपल्या हातून काही ना काही गोष्टी अनावधानाने घडत असतात. असाच एक प्रकार नुकताच विमानात घडला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समधील (PIA) एका महिला प्रवाशाने शौचालयाचा दरवाजा समजून विमानाचा आपात्कालिन दरवाजा उघडला. यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सकडूनही याबाबत माहिती देण्यात आली असून विमान मँचेस्टर विमानतळाच्या धावपट्टीवर उभे असताना हा प्रकार घडल्याची माहिती दिली.

या संपूर्ण प्रकारानंतर पीके – 702 या विमानाला 7 तासांचा विलंब झाल्याची माहिती पीआयएच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. एका महिला प्रवाशाने अनावधानाने शौचालयाचा दरवाजा उघडण्याऐवजी विमानाच्या आपात्कालिन दरवाजाचे बटण दाबले. त्यामुळे विमानाचा आपात्कालिन दरवाजा उघडला. यानंतर विमानात असलेल्या 40 प्रवाशांना त्यांच्या सामानासहित पुन्हा विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली.

दरम्यान, यानंतर प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती. तसेच त्यांच्यासाठी दुसऱ्या विमानाचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पीआयएच्या प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान, पीआयएचे मुख्य कार्यकारी अधिकारी एअर मार्शल अरशद मलिक यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.