बलात्काऱ्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा व्हायला हवी, हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. भारतात २०१२ साली झालेल्या निर्भया सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणापासून या मुद्द्यावर वारंवार चर्चा होताना दिसत आहे. तोच प्रकार पाकिस्तानमध्ये देखील दिसत असून बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी आता पाकिस्तानच्या संसदेतल्या सर्व महिला खासदारांनी एकमुखाने केली आहे. इस्लामाबादमध्ये नुकत्याच घडलेल्या एका बलात्कार प्रकरणाविषयी बोलताना पाकिस्तानच्या संसदेमध्ये एका महिला खासदाराला रडू कोसळलं. त्यानंतर सर्व महिला खासदारांनी एकमुखाने संसदेसमोर आपली मागणी ठेवली आहे.

विकृतांमध्ये शिक्षेचं भय हवं!

बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी कायदे असून देखील बलात्काराची प्रकरणं कमी होताना दिसत नाहीत. गुन्हेगारांना जरब बसणार नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. त्यामुळे अशा विकृतांमध्ये शिक्षेचं भय निर्माण व्हावं, यासाठी कठोरात कठोर शिक्षेची तरतूद व्हायला हवी, अशी मागणी भारतात देखील अनेकदा करण्यात आली आहे. त्याच प्रकारची मागणी आता पाकिस्तानात केली जात असून सर्वपक्षीय महिला खासदारांनीच संसदेमध्ये ही मागणी मांडली आहे.

पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्ष तेहरीक-ए-इन्साफच्या सर्व महिला खासदार, विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाच्या महिला खासदार आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या महिला खासदारांनी मिळून ही मागणी केल्याचं वृत्त द हिंदूने डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या हवाल्याने दिलं आहे.

पाकिस्तानच्या महिला खासदार म्हणतात…

> आम्ही ६९ महिला खासदार बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वेगवान खटला चालवून बलात्काऱ्याला भर चौकात फाशी देण्याची मागणी करत आहोत – सईदा इफ्तिकार, पीएमएल-एन

> जर पाकिस्तानला विकास साधायचा असेल, तर बलात्काऱ्यांना आणि खुन्यांना भर चौकात फाशी दिली जायला हवी – आस्मा कादिर, तेहरीक-ए-पाकिस्तान

> जर अशा घटना रोखायच्या असतील, तर बलात्काऱ्यांना सगळ्यांसमोर फाशी द्यायला हवं – मौलाना अकबर चित्राली, जमाती-इ-इस्लामी

> भविष्यात इस्लामाबादसारख्या घटना घडू नयेत, यासाठी बलात्काऱ्यांना कठोर शासन व्हायलाच हवं – मेहनाज अकबर अजीज, पीएमएल-एन

> लहान मुलांचं शोषण आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहाता बलात्काऱ्यांना आणि खुन्यांना सगळ्यांसमोर फाशी देण्याशिवाय दुसरा मार्ग नाही – शमिम आरा पन्हवर, पीपीपी

> सरकारने नुकताच बलात्काराच्या प्रकरणांसंदर्भातला कायदा पारित केला. पण फक्त कायद्याने काही होणार नाही. कारण आता समाजाचा महिलांबाबतचा दृष्टीकोण बदलण्याची गरज आहे – शिरीन मझारी, तेहरीक-ए-पाकिस्तान

इस्लामाबादमध्ये नुकतीच एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्या मुद्द्यावरून इस्लामाबादमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेविषयी संसदेत बोलताना तेहरीत-ए-पाकिस्तान या पाकिस्तानातील सत्ताधारी पक्षाच्या खासदार आस्मा कादिर यांना देखील रडू कोसळलं. लग्नाला नकार दिल्यामुळे एका बड्या व्यावसायिकाच्या मुलाने तिची हत्या केल्याचं समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.