करोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने भारताचा शेजरी असणाऱ्या पाकिस्तानचे कौतुक केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पाकिस्तान सरकारच्या कामाचे कौतुक केलं आहे. पाकिस्तानबरोबरच अन्य सात देशांच्या नावांचा उल्लेख करत या देशांकडून करोनासारख्या साथीच्या आजारांशी कसं लढावं हे शिकलं पाहिजे असं टेड्रोस म्हणाले आहेत. करोनाविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान सरकारने आखलेल्या योजनांचे आणि धोरणांचे जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं. पाकिस्तानमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिओ डोस देण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा वापरण्यात आल्याचे टेड्रोस यांनी नमूद केलं. पाकिस्तानमधील सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही यासाठी चांगले काम केल्याचे टेड्रोस म्हणाले आहेत.

पाकिस्तानने पोलिओचे डोस देण्यासाठी प्रशिक्षण दिलेल्या स्वयंसेवकांचा वापर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी पद्धतीने केल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या स्वयंसेवकांच्या मदतीने पाकिस्तानमध्ये करोना रुग्णांचे कॉनटॅक्ट ट्रेसिंग आणि उपचारासंदर्भातील काम करण्यात आलं. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे. पाकिस्तानबरोबरच थायलंड, कंबोडिया, जपान, न्यूझीलंड, कोरिया, रवांडा, सिनेगल, इटली, स्पेन आणि व्हिएतनामसारख्या देशांनाही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात चांगले काम केले आहे, असं ट्रेड्रोस यांनी म्हटल्याचे ‘गल्फ न्यूज’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. पाकिस्तानबरोबरच थायलंडनेही ४० वर्षांमध्ये निर्माण केलेल्या आरोग्य यंत्रणेचा वापरत करत करोनाच्या प्रादुर्भाव कमी केल्याचे ट्रेड्रोस म्हणाले. तर सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये असणाऱ्या युरोपमधील इटलीसारख्या देशाने काही कठोर निर्णय घेत करोना संसर्गाचा वेग कमी केल्याचे ट्रेड्रोस यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानमधील कामाचे कौतुक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी काम करणारे आरोग्यतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी विशेष सहाय्यक डॉ. जफर मिर्जा यांनी पाकिस्तानच्या करोनाविरुद्धच्या लढ्याच्या मॉडेलला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. मिर्झा यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचा डब्ल्यूएचओने सात देशांमध्ये समावेश केला आहे ज्यांच्याकडून इतर देशांनी भविष्यामध्ये साथीच्या रोगांशी कसे लढावे हे शिकता येईल. पाकिस्तानी लोकांसाठी ही खूप सन्मानाची बाब आहे, असंही मिर्झा यांनी नमूद केलं आहे.

पाकिस्तानमधील एकूण करोनाबाधितांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. पाकिस्तानमध्ये करोनामुळे आतापर्यंत सहा हजार ४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.