पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या प्रशासकीय मुख्यालयावर हल्ला केला आणि हे मुख्यालय उडवले आहे. पाकिस्तानने २३ ऑक्टोबरला पूंछ परिसरात गोळीबार केला होता, त्याला आक्रमक प्रत्युत्तर देताना भारताने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराचं प्रशासकीय मुख्यालय उडवले. भारतीय लष्कराच्या या कारवाईचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.


 
पाकिस्तानकडून 21 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले होते, तर एक जवान जखमी होता. तेव्हापासून नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती होती. या तणावाच्या स्थितीबाबत दोन्ही देशांतील सैन्य अधिकाऱ्यांमध्ये हॉटलाइनद्वारे चर्चाही झाली होती. पण या चर्चेनंतरही 23 ऑक्टोबर रोजी पूंछ आणि झालास भागात पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळचे पाकिस्तानी लष्कराच्या प्रशासकीय मुख्यालयावर हल्ला केला आणि हे मुख्यालय उडवले. या हल्ल्यानंतरची सॅटेलाइट छायाचित्र आता समोर आली आहेत. या चित्रांमधून ज्या ठिकाणी पाकिस्तानी लष्कराचं प्रशासकीय मुख्यालय होतं त्या ठिकाणाहून धुराचे लोट आकाशात जाताना दिसत आहेत.