जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानी लष्कराने भारताने लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

आम्ही दहशतवादाविरुद्ध लढत असून शांतीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगतानाच पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामधील सगळ्याच गोष्टी भारतीय असताना त्यासाठी आम्ही जबाबदार कसे असा सवाल पाकिस्तानी लष्कराने उपस्थित केला आहे. पुलवामा हे नियंत्रणरेषेपासून खूप दूर, हल्ला करणारा तरुण भारतीय होता, हल्ल्यात वापरण्यात आलेली गाडी भारतीय होती, दारुगोळा सर्व काही काश्मिरमधील होते, मग या हल्ल्याशी पाकिस्तानचा काय संबंध आहे असा सवाल पाकिस्तानने केला आहे. या हल्ल्याशी आमचा काहीच संबंध नसून भारत आमच्यावर खोटे आरोप करत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर कोणताही विचार न करता पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत असं पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. तसेच निवडणुकांच्या आधीच भारतीय लष्करावर काश्मीरमध्ये हल्ले कसे होतात असा सवालही पाकिस्तानी लष्कराने उपस्थित केला आहे. पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानला काहीच फायदा नसल्याचे सांगतानाच भारताकडून पाकिस्तानला एकटं पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे.

नियंत्रणरेषेनंतर भारतीय सुरक्षारक्षकांची अनेक कडी आहेत. त्यांची नजर चुकवून एखादी पाकिस्तानी पुलवामापर्यंत जाऊच शकत नाही असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. ज्या प्रदेशामध्ये स्थानिक लोकांपेक्षा लष्कराचे जवान अधिक आहे, मागील ७० वर्षांपासून जिथे भारतीय लष्कर तैनात आहे तिथे पुलवामासारखा हल्ला होत असेल तर तुम्ही तुमच्या लष्कराला हा हल्ला कसा झाला याबद्दल विचारायला हवे असंही पाकिस्तानने म्हटलं आहे. वापरण्यात आलेली स्फोटके काश्मीरमधीलच आहेत, हल्ल्यासाठी जी गाडी वापरण्यात आली तीही पाकिस्तानमधून पाठवण्यात आली नव्हती. तसेच हल्लेखोर हा पाकिस्तानी नसून काश्मीरमधला आहे. त्याचा इतिहास पाहिल्यास त्याच्यावर भारतीय लष्कराने कशाप्रकारे अत्याचार केले मग तो दहशतवादाकडे वळाला आणि त्याला एवढा मोठा हल्ला करण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे.

भारतीय सोशल मिडियावर अशाप्रकारच्या हल्ल्यांची शक्यता आधीपासूनच व्यक्त करण्यात आली होती. कुठे कुठे हल्ले होण्याची शक्यता आहे हेही या हल्ल्यांआधीच्या पोस्टमधून दिसून येत असल्याचे सांगताना पाकिस्तानी लष्कराने सोशल मिडियावरील पोस्टवरुन हा हल्ला पूर्वनियोजित असण्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे. पुलवाम्यामध्ये आत्मघातील हल्ला करणाऱ्या आदिलचा व्हिडीओ पाहिला तर त्यामधील अनेक टेक्निकल गोष्टींमधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत असल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. तसेच आदिलच्या अंतसंस्काराला हजारो स्थानिक लोक उपस्थित राहिल्याचा खोटा दावाही पाकिस्तानी लष्काराने या पत्रकार परिषदेमध्ये केला.

आम्ही शांततेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. आम्ही या प्रवासात चुकांमधून शिकलो आहोत. आता मात्र आम्ही चुका करणार नाही. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही आधी विचार केला मग चौकशी केली आणि त्यानंतरच भारताला उत्तर दिल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. एका जबाबदार देशाचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी भारताला पाकिस्तानने या आधी कधीही दिली नव्हती अशी ऑफर दिल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. हवी ती चौकशी करायला आम्ही तयार आहोत आम्हाला पुरावे द्या असं पंतप्रधान म्हणाले. तुमच्या दबावाखाली नाही तर आम्ही आमच्या भल्यासाठी कठोर कारवाई करु असे आश्वासनही पंतप्रधान इम्रान खान यांनी दिल्याचे पाकिस्तानी लष्कराने सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर युद्धाच्या चर्चांना जोर आला असतानाच पाकिस्तानी लष्कराने आज पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.