पाकिस्तानात उद्भवलेल्या पेचप्रसंगावर तोडगा निघण्याची चिन्हे नसतानाच आंदोलकांचे नेते इम्रान खान यांच्या पक्षातच फूट पडली आहे.
 पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी धडक मारण्याच्या इम्रान खान यांच्या निर्णयास विरोध करणारे पक्षातील ज्येष्ठ नेते जावेद हाश्मी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तसेच पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेंब्ली’च्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या तिघा सदस्यांनाही पक्षातून बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, शनिवारी पोलीस आणि सरकारविरोधी निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये किमान तीन जण ठार, तर पाचशेहून अधिक आंदोलक जखमी झाले. या जखमींमध्ये अनेक पत्रकारांचा समावेश होता. तर रावळपिंडी येथे पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. सलग १८ दिवस सुरू असलेले हे आंदोलन शमवण्यासाठी तसेच या पेचप्रसंगातून तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. तर पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या पेचावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी नॅशनल असेंब्लीचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. लाहोर येथे गेलेल्या पंतप्रधान शरीफ यांना त्यांच्या निवासस्थानी परतू न देण्याचा निर्धार पाकिस्तान तेहरिक ए इन्साफच्या कार्यकर्त्यांनी केला असला, तरी रविवारी पंतप्रधान शरीफ इस्लामाबाद येथे परतले. आंदोलकांनी पाकिस्तानातील आघाडीच्या जिओ न्यूज या वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच शनिवारी रात्री पंतप्रधानांच्या निवासस्थानासह महत्त्वाच्या सरकारी वास्तू असलेल्या परिसरात पोलिसांनी घातलेली बॅरिकेडस् मोडून शिरकाव करण्याचा प्रयत्न केला.
लाहोरलाही चकमकी
लाहोर येथे लिबर्टी चौक व मॉल रोड येथे निदर्शकांची पोलिसांशी चकमक झाली. संरक्षणमंत्री ख्लाजा आसीफ यांच्या सियालकोट येथील निवासस्थानी निदर्शकांनी दगडफेक केली. मुलतानमध्ये ‘इन्साफ’च्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले.
बंदुकीच्या धाकाने कोणत्याही मागण्या मान्य होत नाहीत. खुल्या चर्चेस सरकार तयार आहे, मात्र विरोधकच चर्चेसाठी तयार नाहीत. त्यांनी तयारी दर्शविल्यास हा पेच सुटू शकतो.
-परवेझ रशीद, पाकचे माहितीमंत्री