पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे सांगत दोन दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलले होते. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरच्या नौशेरा भागातील लष्करी चौक्या उदध्वस्त केल्या होत्या. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य घाबरल्याची चिन्हे असून, त्यांनी आपल्या लष्करी चौक्या हलविल्या असल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमारेषेवर कुरापती केल्या जात आहेत. या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ठोस पाऊले उचलली होती. या कारवाईत नौशेरा सेक्टरमधील पाक लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईनंतर आज पाकिस्तानी लष्कराने आपल्या सीमेवरील चौक्या सीमेपासून २ ते ३ किलोमीटर आतमध्ये हलविल्या आहेत.

इतकेच नाही तर पाकिस्तानने आपल्या ताब्यात असलेल्या घुसखोरांनाही आणखी सुरक्षितस्थळी हलविले आहे. नौशेरातील कारवाईनंतर पाकिस्तानने आपल्या सैनिकांना सुरक्षित स्थळी हलविल्याची दिसते आहे.

नौशेरा येथील कारवाईवर पाकिस्तानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण कुलभूषण जाधव प्रकरणानंतर आता भारतीय जवानांनी पाक लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याने येत्या काळात दोन्ही देशांमधील तणावात भर पडण्याची शक्यता आहे.