पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये लाहोर येथे अचानक थांबून पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची घेतलेली भेट तेथील लष्कराच्या पचनी पडली नव्हती, अशी माहिती आता उघड होत आहे. दोन्ही देशांत विशिष्ट चौकटीत आणि शिष्टसंमत मार्गाने चर्चा व्हावी, असे पाक लष्कराचे मत आहे.
मोदी यांनी रशिया आणि अफगाणिस्तानचा दौरा करून परत येताना वाटेत पाकिस्तानमध्ये अचानक थांबून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अफगाणिस्तानहून भारतात परत येताना ते २५ डिसेंबर २०१५ रोजी कोणालाही पूर्वसूचना न देता लाहोर येथे विमानाने पोहोचले. त्यांच्या या कृतीचे जागतिक राजकारणात आश्चर्यमिश्रित कौतुक झाले. मात्र पाकिस्तानी लष्कराला ही बाब पसंत पडली नव्हती, अशी माहिती आता पुढे येत आहे. या भेटीला पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ हजर नव्हते. मोदींनी ज्या प्रकारे उत्स्फूर्त आणि मैत्रीच्या वातावरणात पाकिस्तानला भेट दिली त्याबद्दल पाकिस्तानी लष्करात नाराजी आहे.