18 January 2018

News Flash

पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग तिसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन

भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 12:27 PM

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानकडून सलग तिसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सकाळी पावणे नऊच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. काल (मंगळवारी) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. त्यानंतर आजही सकाळपासून पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरुच ठेवला.

पाकिस्तानने आज लहान शस्त्रांच्या मदतीने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. याशिवाय पाकिस्तानी लष्कराकडून मोर्टारचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानकडून कालही नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये नायक मोहिंदर चेन्जंग यांना वीरमरण आले. मोहिंदर मेंढर सेक्टरमधील चेरा फॉरवर्ड पोस्टवर तैनात होते. या भागात भारतीय जवानांकडून गस्त घातली जात असताना पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये मोहिंदर शहीद झाले. पाकिस्तानकडून सोमवारपासून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सोमवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास श्रीनगरमधील विमानतळाजवळील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. १८२ व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला. यानंतर विमानतळ परिसराला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा मनसुबा धुळीस मिळवला. सीमा सुरक्षा दलाच्या जवावांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात सहाय्यक उपनिरीक्षक बी. के. यादव यांना वीरमरण आले. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी घुसल्याची गोपनीय माहिती आधीच उपलब्ध झाल्याने दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात बीएसएफला यश आले.

First Published on October 4, 2017 12:19 pm

Web Title: pakistan army violated ceasefire in jammu kashmirs poonch sector
  1. No Comments.