मुंबई हल्ला खटला प्रकरणी पाकिस्तानचे भारताला पत्र
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात सुनावणी चालू असून, भारताने त्यातील २४ साक्षीदारांना पाकिस्तानात पाठवावे, असे या खटल्यातील अभियोक्त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने भारत सरकारला पत्र पाठवले असून, त्यात २४ साक्षीदारांना मुंबई हल्ला प्रकरणातील खटल्यात साक्ष देण्यासाठी पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे, असे मुख्य अभियोक्ता चौधरी अझर यांनी सांगितले. ते म्हणाले, की इस्लामाबाद येथील दहशतवाद विरोधी न्यायालयाने सर्व पाकिस्तानी साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, गेली सहा वर्षे हा खटला सुरू आहे. आता सगळे काही भारतावर अवलंबून आहे. भारत सरकारने मुंबई हल्ल्यातील सर्व चोवीस साक्षीदारांना पाकिस्तानात पाठवावे, त्यांचे जबाब नोंदवून घेतले जातील. त्याशिवाय सुनावणी पुढे नेता येणार नाही, असे संघराज्य चौकशी संस्थेचे अभियोक्ता अझर यांनी सांगितले. लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकीउर रहमान लखवीसह सात आरोपींवर इस्लामाबादच्या न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायालयाने गेल्या महिन्यात असा आदेश दिला, की भारतातील चोवीस साक्षीदारांना जबाबासाठी पाकिस्तानात हजर करावे. अजमल कसाब व इतर दहशतवाद्यांनी जी बोट वापरली होती ती पाकिस्तानात परत आणावी. त्याच्या आधारे संबंधित बाबींची तपासणी करता येईल. पाकिस्तानी न्यायिक आयोगाच्या आठ सदस्यांनी पाकिस्तानी दहशतवाद विरोधी न्यायालयाच्या वतीने भारताला भेट दिली आहे. भारतीय साक्षीदारांचे जाबजबाब हे पुराव्यादाखल नोंदवले जाणार आहेत. लखवीच्या वकिलांनी पाकिस्तानी आयोगाच्या भेटीतील कामकाजास आक्षेप घेतला आहे, कारण मुख्य महानगर दंडाधिकारी एस. एस. शिंदे यांनी पाकिस्तानी आयोगाला भारतीय साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यास मज्जाव केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी २००८ मधील मुंबई हल्ला खटल्यात लष्कर ए तोयबाच्या सात दहशतवाद्यांना अटक केली असून, त्यात लखवी याच्याशिवाय अब्दुल वाजिद, मझर इक्बाल, सादिक, शाहिद जमील, जमील अहमद, युनूस अंजुम यांचा समावेश आहे. त्यांच्यावरचा खटला २००९ मध्ये सुरू झाला आहे. २०१४ मध्ये लखवी याला जामीन मिळाला असून, त्याला १० एप्रिल २०१५ रोजी रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगातून सोडण्यात आले त्या वेळी लाहोर न्यायालयाने लखवी याला स्थानबद्ध करण्याचा सरकारचा आदेश रद्दबातल ठरवला होता. इतर सहा आरोपी अजून अदियाला तुरुंगात आहेत.