अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच यापुढे ‘दुटप्पीपणा’ करणार नाही, अशी हमी पाकिस्तानने दिल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे. अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत एम.शायदा अब्दाली यांनी ही माहिती दिली.
दहशतवादविरोधात आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तेव्हा आमच्याशी वागताना-चर्चा करताना दुटप्पीपणा टाळा, अशी सूचना अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी पाक पंतप्रधानांचे संरक्षण सल्लागार सरताज अजीज यांच्याकडे केली होती. पाकिस्तानने तालिबान्यांवरील आपला प्रभाव या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वापरावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
ऑब्जव्र्हर रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘अफगाणिस्तान इन ट्रान्झिशन’ या विषयावरील व्याख्यानात अब्दाली बोलत होते. आजही शांतता प्रक्रियेपेक्षा युद्धाला प्राधान्य देणाऱ्या शक्तींविरुद्ध पाकिस्तानने सहकार्य करण्याचे मान्य केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भारताने नवीन अफगाणिस्तानच्या निर्मितीसाठी केलेल्या सहकार्याचे अब्दाली यांनी कौतुक केले.
भेट पुन्हा लांबणीवर
इस्लामाबाद, लाहोर: मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याच्या पुराव्यांची उलट तपासणी करण्यासाठी येणाऱ्या न्यायालयीन आयोगाने आपली भारतभेट गणेशोत्सवामुळे दहा दिवस लांबणीवर टाकली आह़े अशी माहिती संरक्षण वकिलाने मंगळवारी दिली़
सोमवारी त्याची भेट ठरविण्यात आली होती़ परंतु, गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतील न्यायालये बंद असल्यामुळे ही भेट होऊ शकणार नाही, असे भारत शासनाकडून सांगण्यात आले होते, असे पाकिस्तानी वकील रियाज अक्रम चिमा यांनी सांगितल़े आता भारताकडून या भेटीसाठी नव्या तारखा कळविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितल़े सात पाकिस्तानी आरोपींची बाजू मांडणाऱ्या पाकिस्तानी वकिलांच्या मंडळात रियाज यांचाही सहभाग आह़े
ही महत्त्वपूर्ण भेट याच महिन्यात या पूर्वी दोनदा रद्द करण्यात आली होती़ सप्टेंबरच्या सुरुवातीला पाकिस्तानी विमान रद्द झाल्यामुळे ही भेट पुढे ढकलण्यात आली होती़ त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी भेट नक्की करण्यात आली होती़ परंतु विमानाची व्यवस्था नसल्याने ती पुन्हा रद्द करण्यात आली़ आणि आता गणेश चतुर्थीनिमित्त पुढे ढकलण्यात आली आह़े
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 12:02 pm