नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीनिमित्त संरक्षणमंत्र्यांकडून लष्करी धोरणाचा पुनरुच्चार

पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून जनरल कमर जावेद बाजवा हे पदभार स्वीकारणार असतानाच, आपले लक्ष भारतासोबत असलेल्या पूर्व सीमेवर केंद्रित राहणार असल्याचे प्रतिपादन पाकिस्तानने केले आहे. दरम्यान, आपल्या भूमीचा वापर आपल्या शेजाऱ्यांविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी न करू देण्याचे आपले वचन पाळावे, याची आठवण अमेरिकेने इस्लामाबादला करून दिली आहे.

सैनिकांच्या संख्येचा विचार करता जगात सहाव्या क्रमांकाच्या लष्कराचे प्रमुख म्हणून बाजवा हे मावळते लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. मंगळवारी निवृत्त होत असलेल्या शरीफ यांनी सोमवारी अध्यक्ष ममनून हुसेन व पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटी घेतल्या.

देशाचे लष्करी धोरण कायम राहणार असून, बाजवा यांच्या नेतृत्वात त्यात काही तत्काळ बदल होणार नाही, असे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी जिओ न्यूजला सांगितले. आमचे लक्ष देशाच्या पूर्व सीमेकडे राहणार असून, देशाच्या पाठिंब्याने सैन्यदले सर्व आव्हानांचा सामना करतील, असे ते म्हणाले.

गेल्या वीस वर्षांहून अधिकच्या काळात आपला कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होणारे राहील शरीफ हे पहिले लष्करप्रमुख ठरतील.

यापूर्वीच्या लष्करप्रमुखांनी एकतर सेवेला मुदतवाढ मिळवली होती किंवा परवेझ मुशर्रफ यांच्याप्रमाणे बंड केले होते.

दरम्यान, अमेरिकेने रविवारी नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचे स्वागत करतानाच, पाकिस्तान आपल्या भूमीचा उपयोग त्याच्या शेजाऱ्यांविरुद्ध दहशतवादासाठी कधीच करू देणार नाही अशी आशा व्यक्त केली. इस्लामाबादेतील अमेरिकी दूतावासाने एका निवेदनात पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केलेल्या बाजवा यांच्या नेमणुकीचे स्वागत केले.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे ७० वर्षांच्या इतिहासात निम्म्याहून अधिक काळ लष्कराचे देशावर नियंत्रण राहिले आहे.