भारताने कलम ३७० रद्द करत जम्मू काश्मीरला देण्यात येणारा विशेष दर्जा रद्द करत जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रसाशित प्रदेश निर्माण करण्याची घोषणा केली आहे. या घोषणनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये पाकिस्तानने अनेकदा भारताला आपल्या सैन्यशक्तीची भिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता पाकिस्तानमधील सुरक्षा संदर्भातील तज्ज्ञांनीच पाकिस्तानची पोलखोल केली आहे. ‘मिलेट्री इंक… इनसाइड पाकिस्तान मिलेट्री इकनॉमी’ या पुस्तकाच्या लेखिका आणि सुरक्षातज्ज्ञ आयशा सिद्दीकी यांनी पाकिस्तानला आता भारताबरोबरचे युद्ध परवडणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. तसचं पाकिस्तानच्या सैनिक शक्तीच्या धमक्या पोकळ असल्याची पोलखोलही आयशा यांनी केली आहे.

पाकिस्तानी लष्कर भारतीय सैन्यासमोर युद्धभूमीवर फार काळ टिकू शकणार नाही असं आयशा यांनी म्हटलं आहे. “पाकिस्तानची सध्याची अर्थिक स्थिती खूपच गंभीर आहे. देशात आर्थिक मंदी असून चलन दर सरकारच्या नियंत्रणात राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानला भारताशी युद्ध परवडणारे नाही,” असं आयशा म्हणाल्या आहेत.

पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांनाही ठाऊक आहे पाकिस्तानचा पराभव होणार

“जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमधील माझ्या मित्रांना मी पाकिस्तानी लष्कर भारताविरुद्ध युध्दाची घोषणा का करत नाही असा सवाल केला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तान युद्ध हरेल हे त्यांना ठाऊक असल्याचे ते युद्धाची घोषणा करत नाहीत असं उत्तर दिलं. यावरुन अगदी सामान्य नागरिकांनाही पाकिस्तानी सैन्याला भारतीय सेनेसमोर निभाव लागणार नाही याचा अंदाज आहे. सध्या पाकिस्तानला युद्ध करता येणार नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे,” असंही आयशा यांनी सांगितले.

“आर्थिक मंदीच्या झळा सामान्यांना बसत असून पहिल्यांदाच आपल्याला भारताविरुद्ध युद्ध परवडणारे नाही याची जाणीव सामान्य पाकिस्तानी नागरिकांना झाली आहे,” असं आयशा म्हणाल्या. मागील ७२ वर्षांपासून पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरुन भारताबरोबर अनेकदा युद्ध केले आहे पण प्रत्येक वेळेस त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काश्मीरसंदर्भात भारताने निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमधील काही भागांमधील लोकांमध्ये खूप संताप असून त्यांनी भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काश्मीर मुद्द्यावरुन अनेक ठिकाणी मागितली मदत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला ट्विटवरुन युद्धाची धमकी दिल्यानंतर आयशा यांनी आपले मत व्यक्त केले आहे. काश्मीर मुद्द्यावरुन मित्रराष्ट्रांनी पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलून धरावी यासाठी इम्रान खान प्रयत्न करत आहेत. मात्र आतापर्यंत सर्वच ठिकाणांहून निराशाच त्यांच्या पदरी पडली आहे. जगभरातील अनेक देशांनी काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.