जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य एका मंदिरात घडले. असे असूनही भाजपाचे नेते नंदकुमार सिंग चौहान यांनी पाकिस्तातून परतलेल्या दहशतवाद्यांनी ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला अशी मुक्ताफळे उधळली आहेत.

नंदकुमारसिंग चौहान हे मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या घटनेमागे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असून पाकिस्तानातून परतलेल्या दहशतवाद्यांनीच या आठ वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष आणि क्रूर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली व त्यानंतर जय श्रीरामचे नारे देण्यात आले यावरूनच हे उघड होते की यामागे पाकिस्तानचे एजंट आहेत.

बलात्कार आणि हत्या करण्यात आलेली ती लहान मुलगी भारताची होती. भारतात हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ नाही. ही तेढ निर्माण व्हावी दोन्ही धर्माच्या लोकांनी आपसांत लढावे याच उद्देशाने या आठ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असे नंदकुमार सिंग चौहान यांनी म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासानुसार, अल्पवयीन मुलीला मंदिरात ठेवण्यात आले. तिला अंमली पदार्थ देण्यात आले. त्यानंतर तिच्या हत्येपूर्वी एक आठवडाभर अनेकवेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मंदिरात डांबून ठेवलेल्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यासाठी एक आरोपी खास मेरठहून आला होता. तुझी वासना जर मिटवायची असेल तर इकडे ये, असे त्याला सांगण्यात आले होते.

त्यानंतर एका पोलीस असलेल्या आरोपीला मुलीची हत्या करण्यापूर्वी पुन्हा एकदा बलात्कार करायचा होता. त्यानंतर इतर लोकांनीही तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. नंतर मुलीची हत्या करण्यात आली. मुलीचे डोके अनेकवेळा दगडावर आपटले होते. बलात्कारातील आरोपी रामला वाचवण्यासाठी पोलिसांना दीड लाख रूपये देण्यात आले होते. अशात आता भाजपा नेत्याने बलात्कारी पाकिस्तानातून आले होते अशी मुक्ताफळे उधळली आहेत.