पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईद याच्या तहरीक ए आझादी जम्मू अँड काश्मीर या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. हाफिज सईद हा मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्याच्या तहरीक ए आझादी या संघटनेवर बंदी घातली जाणे हा ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीनंतरचे मोठे यश मानले जाते आहे. जानेवारी महिन्यापासूनच हाफिजला नजर कैदैत ठेवण्यात आले आहे. मात्र आता पाकिस्तानच्या नॅशनल काऊंटर टेरिरिझम अथॉरिटी अर्थात एनसीटीएने तहरीकवर बंदी घातली आहे.

हाफिज सईदच्या जमात उद दावा या संघटनेचे दुसरे रूप म्हणून तहरीक ए आझादीकडे पाहिले जाते आहे. आता मात्र ८ जूनपासून या संघटनेचा समावेश बंदी असलेल्या संघटनांच्या यादीत करण्यात आला असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. हाफिज सईदच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले, तेव्हापासून त्याने जमात उद दावा या आपल्या संघटनेचे नाव बदलून तहरीक ए आझादी जम्मू अँड काश्मीर असे ठेवले. मात्र आता या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

एनसीटीएच्या यादीत जैश ए मोहम्मद, अल कायदा, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तहरीक ए तालिबान यांचाही समावेश आहे. या सगळ्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. मात्र पहिल्यादांच हाफिज सईदशी थेट संबंध असलेल्या तहरीक ए आझादी या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. ग्लोबल फायनान्शिअल टेरर बॉडी अॅक्शन टास्क फोर्स समोर भारताने हाफिज सईदच्या तहरीक ए आझादीचा उल्लेख केला त्यामुळे या संघटनेवर पाकिस्तानने तातडीने बंदी घातल्याचे बोलले जाते आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानातल्या वाढत्या दहशतवादी कारवायांविरोधात कठोर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकन सरकारने दहशतवाद्यांवर ड्रोन हल्ला करण्याचा इशारा दिला असल्याचे रॉयटर्स या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पाकिस्तानचा नाटोमधला सदस्यत्त्वाचा दर्जा कमी करण्यासाठीही अमेरिकेने प्रयत्न सुरू केल्यामुळे आपण काहीतरी कारवाई करतो आहोत, असा देखावा पाकिस्तानने या कारवाईतून केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानातल्या अतिरेक्यांचा खात्मा करणार असा इशारा दिला होता. त्यामुळे डोके ठिकाणावर नसलेल्या पाकिस्तानने हाफिज सईदच्या तहरीक ए आझादी या संघटनेवर कारवाई करत, संघटनेवर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर या संघटनेच्या कारवायांवर नजर ठेवायलाही सुरूवात केली आहे.