दहशतवाद्यांच्या बाबतीत ‘चांगले आणि वाईट’ अशी विभागणी करण्यापासून पाकिस्तानला परावृत्त करण्यासाठी जगभरातून दबाव वाढल्यानंतर अखेर पाकिस्तानने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. हाफीझ सईद याच्या जमात उद दावा या अतिरेकी संघटनेवर तसेच धोकादायक अशा हक्कानी नेटवर्कवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार हाफीझ सईद यांच्या परदेशगमनावरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा येत्या २५ जानेवारीला भारतात येत आहेत.
या पाश्र्वभूमीवर ओबामा यांच्यासाठी तैनात करण्यात आलेल्या गाडीत बॉम्ब ठेवण्याची धमकी अतिरेकी संघटनांनी दिल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने पाकिस्तानला सज्जड दम भरला होता. मुंबई हल्ल्यामागील सूत्रधार झकी ऊर रेहमान लख्वी याला भारताच्या हाती द्या, असे आदेशही या दोन्ही देशांनी फर्मावले होते. तसेच पाकिस्तानकडून ‘चांगले आणि वाईट दहशतवादी’ अशी विभागणी केली जात आहे. त्याबद्दलही जगभरातून पाकिस्तानचे ‘कान उपटले’ जात आहेत.