काश्मीर खोऱ्याच्या विकासाच्या नावाखाली पाकिस्तान जगभरातून पैसा गोळा करीत असून त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करीत असल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. दोन दहशतवाद्यांच्या संभाषणातूनच ही बाब समोर आली आहे. गेल्याच महिन्यांत चकमकीत ठार झालेला हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर झाकीर मुसा याच्या आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू दुजाना यांच्यातील संभाषणाची एक जुनी ऑडिओ क्लीप समोर आली आहे. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये मुसा आणि दुजाना या दोन दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेनुसार, काश्मीर खोऱ्यात शरियत अर्थात इस्लामिक कायदा प्रस्थापित करण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे. मुसाच्या वक्तव्यानुसार, पाकिस्तान काश्मीर खोऱ्याच्या विकासाच्या नावाखाली पैसा गोळा करीत असून त्याचा वापर खोऱ्यात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याकरीता शस्त्रे आणि दारुगोळा जमवण्यासाठी केला जात आहे.

झाकिर मुसाने बुऱ्हान वानीला काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी बळ दिले होते. तो अन्सार गझवात-उल-हिंद या अल कायदाशी संबंधीत संघटनेचा प्रमुख होता. मे महिन्यात तो दक्षीण काश्मीरमधील त्राल येथे झालेल्या सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत ठार झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर शोपियां, पुलवामा, अवंतीपूरा आणि श्रीनगर येथे त्याच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलने झाली होती.