ईश्वर निंदेप्रकरणी पाकिस्तानच्या मुलतान येथील तुरुंगात असलेल्या आसिया या महिलेची अखेर बुधवारी सुटका झाली. बुधवारी रात्री आसियाची तुरुंगातून सुटका झाली असून तिला विमानाने अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आसिया या ख्रिश्चन महिलेला ईश्वरनिंदेप्रकरणी सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय गेल्या आठवड्यात दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेकांनी रस्त्यावर उतरुन निर्णयाविरोधात निदर्शन करण्यास सुरुवात केली होती. चार मुलांची आई असणाऱ्या आसिया यांना २०१० साली ईश्वरनिंदेप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासूनच त्या तुरुंगात मृत्यूच्या छायेत आपलं आयुष्य व्यतित करत होत्या. आसियाचे वकील तिची शिक्षा माफ करण्यासाठी आणि तिच्या जामिनासाठी प्रयत्न करत होते. २०१६ मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात तिच्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी रात्री तिची तुरुंगातून सुटका करण्यात आली. मुलतानमधील तुरुंगातून तिला रावळपिंडीतील हवाई दलाच्या तळावर नेण्यात आले. तिथून तिची रवानगी अज्ञातस्थळी करण्यात आली. आसिया या नेदरलँडला गेल्याचे वृत्त पाकमधील काही वृत्तवाहिन्यांनी दिले होते. मात्र, आसिया या पाकिस्तानमध्येच आहेत, त्या देशाबाहेर गेलेल्या नाहीत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. नेदरलँड व अन्य देशांनी आसियाला नागरिकत्व देण्याची तयारी दर्शवली आहे. तर आसियाला देशाबाहेर जाता येऊ नये, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे पाक सरकारमधील सूत्रांची आधीच स्पष्ट केले आहे.

प्रकरण नेमके काय?
ही घटना पाकिस्तानात २००९ मधील उन्हाळ्यात घडली. आसिया यांनी एका विहीरीतलं पाणी बादलीने पाणी बाहेर काढले. यानंतर तिथेच ठेवलेल्या ग्लासमधून त्या पाणी प्यायल्या. तिथे उपस्थित असलेल्या काही महिलांनाही त्यांनी ग्लासभर पाणी दिले. त्याचवेळी दुसऱ्या एका महिलेने त्यांना अडवले. महिलेने पाणी पिण्यापासून रोखले कारण ते पाणी हराम होते. ख्रिस्ती महिलेने त्या पाण्याला स्पर्श करून अशुद्ध केले. त्यावर येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांनी या कार्यास एकाच नजरेतून पाहिले असते असे उत्तर आसियाने दिले. आसियाचे उत्तर ऐकूण महिलांनी गोंधळ घातला. मोहम्मद पैगंबर यांची तुलना येशू ख्रिस्तांशी केलीच कशी असा जाब त्यांनी तिला विचारला. यातून इस्लामचा स्वीकार करूनच तू वाचू शकतेस असे तेथील महिलांनी सांगितले. पण, आसियाने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. मला आपल्या धर्मावर आस्था आहे आणि धर्म परिवर्तन करणार नाही असे तिने सर्वांना सांगितले. यानंतर तिने इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माची तुलना करताना येशू ख्रिस्तांचे कौतुक केले. त्याच गोष्टीचा लोकांना प्रचंड राग आल आणि शेवटी तिला अटक करण्यात आली.