इस्लामाबाद : ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यास पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी शुक्रवारी नकार दिला. अबुधाबी येथे होणाऱ्या या बैठकीत भारताच्या समपदस्थ सुषमा स्वराज या उपस्थित राहणार असल्याने आपण त्यावर बहिष्कार टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात कुरेशी यांनी सांगितले, की ओआयसीच्या परराष्ट्र मंत्री परिषदेत आपण उपस्थित राहणार नाही, कारण या संघटनेने भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सन्माननीय पाहुण्या म्हणून निमंत्रण दिले आहे. असे असले तरी पाकिस्तानचे कनिष्ठ अधिकारी या बैठकीत प्रतिनिधित्व करतील.

ओआयसी परिषदेवर बहिष्काराच्या कुरेशी यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले, की यात कुरेशी यांचे डोके आहे, पण त्यांना काय करायचे ते करू द्यात.

ओआयसी या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेची बैठक अबुधाबीत होत असून, त्यात प्रथमच भारताला निमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निमंत्रण मागे घ्यावे अशी मागणी पाकिस्तानने केली होती, पण ती फेटाळण्यात आली. कुरेशी यांनी सांगितले, की ओआयसी हे आमचे घर आहे, पण तेथे जाऊन स्वराज यांच्याशी बोलण्याची आमची इच्छा नाही. भारताने बालाकोट येथे दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले, त्यामुळे स्वराज यांचे निमंत्रण रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. १९६९ मध्ये पाकिस्तानच्या सांगण्यावरून मोरोक्को परिषदेचे भारताचे निमंत्रण रद्द झाले होते.