दिल्लीमधील पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना भारतीय यंत्रणा विनाकारण त्रास देत आहेत असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने भारतातील आपले उच्चायुक्त सोहेल महमूद यांना इस्लामाबादला बोलावून घेतले आहे. दूतावासातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांना त्रास दिल्या प्रकरणी उच्चायुक्तांशी चर्चा करणार आहोत असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतात राहणारे आमचे राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत असा आरोप मोहम्मद फैझल यांनी केला. या प्रकरणी आम्ही भारताचे उपउचायुक्त आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवला आहे असे फैझल यांनी सांगितले. नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी आणि त्यांची कुटुंबे मागच्या काही दिवसांपासून भारतीय यंत्रणांच्या दहशतीखाली आहेत. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

मागच्या आठवडयात दिल्लीमध्ये तरुणांच्या एका गटाने आमच्या उप उच्चायुक्तांच्या गाडीचा पाठलाग करुन ड्रायव्हरला अपशब्द सुनावले असा आरोप पाकिस्तानने केला आहे. भारताने मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक ती काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे. मागच्या वर्षी भारतीय अधिकाऱ्यांनाही पाकिस्तानात याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. पण भारताने शांत राहून डिप्लोमसीच्या मार्गाने परिस्थिती हाताळली असे भारताकडून सांगण्यात आले.