पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी कारवाईसाठी पाकिस्तानला इशारा
पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला हा ‘भारताने दीर्घकाळपर्यंत सहन केलेल्या अक्षम्य दहशतवादाचे आणखी एक उदाहरण’ असल्याचे सांगून, पाकिस्तानने त्याच्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवाया मोडून काढाव्यात अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.
आपल्या देशात स्थित असलेल्या दहशतवादी गटांविरुद्ध पाकिस्तान अधिक परिणामकारक कारवाई ‘करू शकतो व त्याने तशी करावी’, असा कडक इशारा ओबामा यांनी दिला. दहशतवादी कारवाया अजिबात खपवून घेतल्या जाऊ नयेत आणि दहशतवाद्यांना शिक्षा दिली जावी, यावर त्यांनी भर दिला.आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांचे जाळे अवैध ठरवून ते मोडून काढण्याबाबत आपण गंभीर असल्याचे दाखवण्याची पाकिस्तानला संधी आहे, असे ओबामा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भारत-अमेरिका संबंध, दहशतवाद आणि पॅरिस येथील वातावरण बदल परिषदेचे फलित याबाबतच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी संपर्क साधल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय देऊन ओबामा म्हणाले, की हिंसक अतिरेक आणि या भागातील दहशतवाद यांचा मुकाबला कसा करावा याबाबत दोन्ही नेते संवाद राखत आहेत.पाकिस्तानमधील असुरक्षितता ही त्यांच्या स्वत:च्या आणि या भागातील स्थैर्याला धोका असल्याचे स्वत: शरीफ यांनी मान्य केले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पेशावर येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी सर्व दहशतवाद्यांना लक्ष्य बनवले आहे. हेच धोरण योग्य आहे. तेव्हापासून आम्ही पाकिस्तानला अनेक दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करताना पाहिले आहे. अशाच प्रकारे दहशतवादी गटांविरुद्ध पाकिस्तान कारवाई करावी, अशी अपेक्षा असल्याचे ओबामा म्हणाले.