पाकिस्तानच्या भूमीत आश्रय घेणाऱ्या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करा, असे थेट आदेशच अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत. पाकिस्तान अशा प्रकारची कारवाई करू शकत नाही, तर त्यानी ठोस कारवाई केली पाहिजे, असेही अमेरिकेने म्हटले आहे. दहशतवादी संघटनांशी लढताना जे नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत, त्यांच्या बलिदानाला आम्ही ‘सॅल्यूट’ करतो. आम्ही तुमच्या लढ्याचे समर्थन करत आहोत, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.

कोणत्याही देशाने आपल्या भूमीचा दहशतवाद्यांना वापर करू देऊ नये. दुसऱ्या देशांवर हल्ले करण्याचा कट रचत असलेल्या दहशतवाद्यांना थारा देऊ नये, असेही अमेरिकेने म्हटले आहे. ‘वी द पीपल’ ऑनलाइन याचिकेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हे उत्तर दिले आहे. या याचिकेवर जवळपास साडेसहा लाख लोकांनी सह्या केल्या आहेत. या याचिकेत पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश घोषित करण्यात यावा, अशी मागणी केली होती.

यापूर्वीही अमेरिकेने अनेकदा पाकिस्तानला या मुद्द्यावरून फटकारले आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकतेच डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. ट्रम्प यांचा विजय आणि त्यांनी मुस्लिमविरोधी आळवलेला सूर आगामी काळात पाकिस्तानसमोर अडचणी निर्माण करू शकतो, असे बोलले जात आहे.