पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद काल झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तानच्या सामन्यात एका चुकीच्या क्षणी कॅमे-यात कैद झाला. पावसाच्या व्यत्ययानंतर जेव्हा सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा सरफराज हा जांभई देत असताना कॅमे-यात टिपला गेला आहे. त्याचे मैदानावर जांभई देतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या पहिल्या डावामध्ये अपेक्षेप्रमाणे पावसाने व्यत्यय आणला. तेव्हा ४७ षटकं संपली होती कर्णधार विराट कोहली आणि शंकर हे खेळत होते. खेळाडूंना साधारण आणखी तासभरासाठी खेळायचे होते. यानंतर पहिला डाव संपला तेव्हा भारताने पाच गडी गमावत पाकिस्तनाला ३३६ धावांचं लक्ष्य दिले. यानंतर पावसाच्या वारंवार व्यत्ययानंतरही भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला.

दरम्यान विश्वचषकातील सर्वात लक्षवेधी ठरेलेला हा सामना जगभरातील कोट्यावधी प्रेक्षकांनी पाहिला शिवाय मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकही याचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. अशावेळी पाकिस्तानचा कर्णधार व यष्टिरक्षक सरफराजकडून मैदानावर खेळादरम्यान घडत असलेली ही चूक कोणाच्याही नजरेस न पडणे अशक्यच होते. यानंतर काहीजणांनी लगेचच ट्विटरवर सरफराजचा जांभई देतानाचा फोटो शेअर करून त्याच्यावर जोक करणे सुरू केले.