News Flash

काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पाचव्यांदा उल्लंघन

गोळीबार करून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केले आहे.

| October 1, 2016 01:43 am

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानने काश्मीरमधील अखनूर जिल्ह्य़ात छोटय़ा शस्त्रांच्या मदतीने गोळीबार करून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केले आहे. सप्टेंबरमध्ये लागोपाठ पाचव्यांदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असे जम्मूचे उपायुक्त सिमरणदीपसिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की, मध्यरात्री १२.३० ते १.३० च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात कुठलीही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानी सैन्याने मेंढर भागातील बलनोई भागात मोठय़ा प्रमाणात गोळीबार केला. २८ सप्टेंबरला पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करी छावण्यांवर गोळीबार केला होता त्यावेळी पूँछ क्षेत्रातील सबझिया भागातील छावण्यांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष ताबा रेषेवर ६ सप्टेंबरला पूँछ क्षेत्रात गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यापूर्वी २ सप्टेंबरला पाकिस्तानी सैन्याने अखनूर क्षेत्रात लष्कराच्या सीमावर्ती भागातील क्षेत्रात गोळीबार केला होता. गेल्या वर्षी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या ४०५ घटना झाल्या होत्या त्यात १६ नागरिक ठार तर इतर ७१ जण जखमी झाले होते.

 

पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानी मंत्रिमंडळाची बैठक

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने बुधवारी पहाटे दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थितीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान शरीफ यांनी भारताने केलेल्या हल्ल्याला कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा यासाठी ही बैठक बोलावली होती. मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी कुठल्याही परिस्थितीत मातृभूमीचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांवर भर देण्यास सांगितले.

पाकिस्तानचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीज यांनी सांगितले की, काश्मिरी लोकांचा लढा हा पाकिस्तानसाठी प्रमुख अग्रक्रम आहे. त्यावर पाकिस्तान मागे हटणार नाही. काश्मीरमधील अत्याचारांवरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष हटवण्यासाठी भारत वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे. पाकिस्तानने भारताशी राजनैतिक पातळीवर सामना केला पाहिजे पण आपली लष्करी दले देशाचे रक्षण करण्यास सुसज्ज असावीत. संरक्षण मंत्री ख्वाजा महंमद असीफ यांनी सांगितले की, पाकिस्तानला संघर्ष चिघळवण्यात फारसे स्वारस्य नाही पण कुठल्याही आव्हानास तोंड द्यायला आमचा देश तयार आहे. पाकिस्तान भारताने प्रत्यक्ष ताबा रेषेपलीकडून केलेल्या प्रत्येक गोळीबारास उत्तर देण्यास सज्ज आहे. भारताचा दृष्टिकोन बेजबाबदारपणाचा असून तो देश तेथील लोकांच्या जनमताशी खेळ करीत आहे.

काश्मिरी लोकांच्या कायदेशीर आशाआकांक्षा दाबून टाकण्याचा त्या देशाला अधिकार नाही. व्यापार मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी सांगितले की, भारत काश्मिरींवरील अत्याचारावरून लक्ष वळवण्यासाठी कृत्रिम तणाव निर्माण करीत आहे. काश्मिरी कामकाज मंत्री चौधरी बर्जीस ताहिर यांनी सांगितले की, काश्मिरी लोकांना संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे. काश्मिरात आता पाचवी पिढी आंदोलन करीत आहे.काश्मिरी लोकांच्या कायदेशीर लढय़ाला दडपून भारत किंवा कुणाचाच फायदा होणारा नाही. दरम्यान परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीज यांनी काश्मीर प्रश्न व भारत-पाक तणावाबाबत मंत्रिमंडळाला माहिती दिली. पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील दूत मलिहा लोधी या संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने चालवलेल्या प्रक्षोभक कृतींची माहिती देणार आहेत.

 

भारत-पाकिस्तान यांनी संघर्ष आणखी वाढवू नये – चीन

बीजिंग : भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थितीवर दोन्ही देशांनी संयम पाळण्याची गरज आहे असे मत चीनने व्यक्त केले आहे. तणाव चिघळणार नाही यासाठी संयम बाळगण्याची गरज आहे असे चीनने म्हटले आहे.

भारत व पाकिस्तान यांचा संयुक्त शेजारी देश म्हणून आपण सध्या दोन्ही देशात असलेल्या तणावाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत असून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शेउंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, संबंधित देशांनी तणावात आणखी वाढ होईल अशा कृती करू नयेत. त्यांनी म्हटले आहे की, प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडू भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकतेच हल्ले केले आहेत. त्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ देता कामा नये. दोन्ही देश आपापसातील मतभेद संवाद व सल्लामसलतीने मिटवतील तसेच तणाव आणखी चिघळू देणार नाहीत अशी आशा आहे. संघर्ष चिघळू नये यासाठी चीन दोन्ही देशांशी संपर्कात आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 1:43 am

Web Title: pakistan ceasefire violation in kashmir
Next Stories
1 पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर
2 राजनाथ सिंह यांच्याकडून देशातील स्थितीचा आढावा
3 मेंदूरोगातील व्यक्तींना माकडे टंकलेखनाची मदत करणार
Just Now!
X