पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात चकमकीत ६० शिया मुस्लिम ठार झाले होते. त्यात दोन अतिरेक्यांचाही समावेश होता, या घटनेस जबाबदार असलेला लष्कर ए झांगवी या प्रतिबंधित संघटनेचा वरिष्ठ कमांडर सुरक्षा दलांशी चकमकीत मारला गेला.
लष्कर-ए-झांगवीचा बलुचिस्तानातील प्रमुख उस्मान सैफुल्ला हा ३० जानेवारीला पाकिस्तानातील सिंध प्रांतात शिकारपूर जिल्हय़ातील मशिदीत झालेल्या अल्पसंख्य शियांच्या हत्येस जबाबदार होता. तो घनी क्वेट्टातील घनी खान चौक येथे एका हॉटेलमध्ये लपला असताना सुरक्षा दलांनी त्याच्यावर छापा टाकला, असे पोलिसांनी सांगितले. उस्मान सैफुल्ला हा लष्कर ए झांगवीचा वरिष्ठ कमांडर असून, बलुचिस्तान शाखेचा अध्यक्ष होता असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस अधिकारी बशीर ब्रोही यांनी सांगितले, की उस्मान सैफुल्ला हा सुरक्षा दलांच्या गोळीबारात मारला गेला. सुरक्षा व गुप्तचर अधिकाऱ्यांनी सायबर रोड येथील घनी खान चौक भागात छापा टाकला. काही अतिरेकी हॉटेलमध्ये लपले असल्याची माहिती मिळाली होती व त्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे छापा टाकला त्या वेळी गोळीबारात जे दोन जण ठार झाले त्यात उस्मानचा समावेश होता.
उस्मान याचा हाजरा समुदायातील लोकांना ठार करण्यातही हात होता व या समाजाला ठरवून लक्ष्य करण्यात आले होते. २००८ मध्ये तो क्वेट्टा येथील तुरुंगातून पळाला होता. बलुचिस्तानच्या गृह खात्याने त्याला पकडण्यासाठी अडीच दशलक्ष रुपयांचे इनाम जाहीर केले होते.
 गुप्तचरांनी सांगितले, की त्याचे अफगाणी तालिबान व अल काईदाशी संबंध होते. कराचीतील दहशतवाद विरोधी अधिकारी उमर खताब यांनी सांगितले, की शिकारपूर हे गाव बलुचिस्तान व सिंध यांच्या सीमेवर आहे, त्यामुळे तेथील हल्ला उस्माननेच केला होता. पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात ३० जानेवारीला शुक्रवारी नमाजाच्या वेळी ६१ अल्पसंख्य शिया मुस्लिम ठार झाले होते.