द हेग : पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेला भारतीय नौदलाचा अधिकारी कुलभूषण जाधव हा हेर होता, व्यापारी नव्हता, असा कांगावा मंगळवारी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केला.

जाधवप्रकरणी चार दिवसांची सुनावणी सोमवारी सुरू झाली. भारताने सुरुवातीपासूनच या प्रकरणाच्या प्रक्रियेत विश्वासच दाखविला नाही, विश्वास दाखविणे हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा एक भाग आहे, असे वकील खवार कुरेशी म्हणाले.

भारत पाकिस्तानला ओळखत नाही, पाकिस्तान शांततेचा पुरस्कर्ता आहे, जागतिक सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या सैनिकांनी बलिदान दिले आहे, असे कुरेशी म्हणाले. भारतीय नौदलाचा अधिकारी जाधव हा हेरच होता, व्यापारी नव्हता, असा आरोप कुरेशी यांनी केला.

दहशतवाद हे भारताचे अधिकृत धोरण असून जाधव हा त्याबाबत एक हत्यार होता. सुनावणीच्या पहिल्या दिवशी भारताने जाधव याच्या त्वरित सुटकेची मागणी केली होती.

सुनावणी स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली

द हेग : नवीन हंगामी न्यायधीशांची निवड करण्यासाठी कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी स्थगित करावी ही पाकिस्तानने केलेली विनंती मंगळवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळून लावली.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढलेला असताना सोमवारपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय असलेल्या द हेगमध्ये जाधव प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.

पाकिस्तानच्या हंगामी न्यायाधीशांच्या प्रकृतीचे कारण देत सुनावणी स्थगित करण्याची विनंती पाकिस्तानने केली. तस्सदाक हुसेन जिलानी या पाकिस्तानच्या न्यायाधीशांना सुनावणीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता.

पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारे अटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान म्हणाले की, आम्ही हंगामी न्यायाधीश नियुक्त करू शकतो, हा आमचा अधिकार आहे. पाकिस्तानला नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी त्याला शपथ द्यावी लागेल आणि पुढील युक्तिवाद करण्यापूर्वी त्या न्यायाधीशांना प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल, असे ते म्हणाले.

तथापि, जागतिक न्यायालयाने पाकिस्तानची विनंती फेटाळली आणि हंगामी न्यायाधीशांच्या अनुपस्थितीत युक्तिवाद सुरू ठेवण्याचे आदेश दिले.