शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्ताननं भारतानेच प्रथम गोळीबार केल्याचा कांगावा केला आहे. भारताने जुरा, शहकोट आणि नौशेरी सेक्टरमधील पाकिस्तानच्या नागरी भागात गोळीबार केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. विशेष म्हणजे प्रत्युत्तरात भारताचे नऊ जवान मारले असल्याचा दावाही पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरातील सीमेवरून भारतात दहशतवादी घुसवण्याच्या उद्देशानं पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्ताननं भारतीय लष्कराच्या चौक्यांसह नागरी भागांमध्ये गोळीबार केला होता. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला उत्तर देताना लष्काराचे दोन जवान शहीद झाले. दरम्यान, नीलम व्हॅली सेक्टरमध्ये घुसखोरीच्या हालचाली आढळून आल्याने लष्काराने धडक कारवाई करत सीमेलगत पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. यात पाकिस्तानच्या पाच सैनिकांसह २० दहशतवादी मारले गेल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, भारतानेच शस्त्रसंधीच उल्लंघन करत गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. विनाकारण भारतानं जुरा, शहकोट आणि नौशेरी सेक्टरमध्ये गोळीबार केल्याचं म्हटलं आहे. यात १ पाकिस्तानी जवानासह तीन नागरिकांचा मृत्यु झाला असल्याचे म्हटलं आहे. पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात भारताचे ९ जवान मारले असल्याचा दावा केला आहे. तसेच भारतीय लष्काराच्या दोन चौक्या उद्ध्वस्त केल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय लष्काराने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला. लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवत ही तळ उद्ध्वस्त केली. भारताच्या कारवाईनं पाकिस्तानचा थयथयाट झाला असून, पाकिस्ताननं भारताचे उप उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना समन्स पाठवले आहे.