म्हणे, अमेरिका भारताची री ओढते

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक चांगले झाल्याची चर्चा होत असल्याने पाकची पोटदुखी वाढली आहे. अमेरिका हा भारताची भाषा बोलत असल्याचा कांगावा पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार यांनी केला.

‘डॉन’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्यानुसार अमेरिकेला काश्मिरींच्या हत्या महत्त्वाची नसल्याचे निसार यांनी म्हटले. लोकशाही आणि मानवाधिकारांचे समर्थन करणाऱ्या अमेरिकेचे दुटप्पी धोरण दिसून येत असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारकडून काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप करीत येथील स्वातंत्र्यसेनानींना दहशतवादी म्हणून घोषित केले जात असल्याचा आरोप निसार यांनी केला.

मोदी-ट्रम्प भेटीआधी अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भेटीदरम्यान दोन्ही देशांनी लष्कर ए तोयबा आणि दाऊद यांसारख्या दहशतवादय़ांविरोधात एकमेकांना सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर सीमेपलीकडे कारवाया करणाऱ्या दहशतवादय़ांना प्रवृत्त न करण्याचा इशाराही या वेळी पाकिस्तानला ट्रम्प आणि मोदी यांनी संयुक्त निवेदनातून दिला. त्याचप्रमाणे २६/११ मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा सुनावण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान काश्मिरी लोकांचे समर्थन करणे थांबवणार नाही, असे चौधरी यांनी म्हटले.

पाकिस्तानची चीनकडून पाठराखण

बीजिंग : दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आपल्या भूमीचा वापर होणार नाही याची खबरदारी घेण्याचा इशारा मोदी आणि ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिल्यानंतर चीनकडून मात्र पाकिस्तानची पाठराखण करण्यात आली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधातील लढाईत सर्वात आघाडीवर असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांना मान्यता देण्याची आवश्यकता असल्याची भूमिका चीनने व्यक्त केली आहे.

आम्ही प्रत्येक वेळी दहशतवादाविरोधी आहे. मात्र दहशतवादासाठी एकाच देशाला जबाबदार ठरविण्याविरोधात आम्ही आहोत. पाकिस्तान दहशतवादाविरोधी कारवाई करण्यासाठी सर्वात पुढे असून, त्यांचे याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी पाकिस्तानची पाठराखण करताना म्हटले आहे. दहशतवाद्यांविरोधात लढाई करण्यासाठी जगभरातील देशांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आवश्यक आहेत. यासाठी पाकिस्तानकडून होत असलेल्या  दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला मान्यता देण्याची गरज असल्याचे लु यांनी म्हटले आहे.