माहिती अधिकारातून बाब उघड; ‘लक्ष्यभेद’ किंवा सौहार्दाच्या प्रयत्नांनीही फरक शून्य,गृह मंत्रालयाची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर वाट चुकवून पाकिस्तानमध्ये जाऊन शरीफ यांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत अथवा भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेला ‘लक्ष्यभेद’ (सर्जिकल स्ट्राइक) असो, याचा कोणताही परिणाम पाकिस्तानवर झाला नसून, पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.२०१५ आणि २०१६ या गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर सीमारेषेवर दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून, यामध्ये २३ जवान ठार झाले आहेत.

२०१२ ते २०१६ या पाच वर्षांच्या कालावधीत जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल १ हजार १४२ दहशतवादी घटना घडल्या असून, त्यामध्ये २३६ जवानांचा नाहक बळी गेला आहे. तसेच यात ९० स्थानिकांचा बळी गेला असून, ५०७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीमारेषेवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत गृहमंत्रालयाकडे माहिती मागवण्यात आली असून, त्यामध्ये गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

गेल्या पाच वर्षांत दहशतवादी हल्ल्याच्या सर्वाधिक म्हणजे ३२२ घटना घडल्या असून, यामध्ये ८२ जवान ठार झाले असून, १५ नागरिक ठार झाले आहेत. २०१५ मध्ये ३९ जवान ठार झाले असून, १७ नागरिक ठार झाले आहेत. तसेच २०८ दहशतवादी हल्ले झाले असून, १०८ दहशतवादी यामध्ये ठार झाले आहेत. तर २०१४ मध्ये ४७ जवान आणि २८ नागरिक ठार झाले असून, ११० दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सध्या दहशतवादी कारवायांबाबत नवा ट्रेंड आला आहे. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना घेरले असता समाजमाध्यमांद्वारे स्थानिकांना संदेश पाठवण्यात येतो आणि स्थानिक त्या ठिकाणी येऊन कारवाईमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, असे बक्षी यांनी सांगितले.

२०१६ मध्ये ४४९ वेळा शस्त्रसंधी उल्लंघन

* माहितीनुसार, २०१६ मध्ये पाकिस्तानकडून सीमारेषेवर ४४९ वेळा शस्त्रसंधी उल्लंघन झाले

* २०१५ मध्ये ४०५ वेळा शस्त्रसंधी उल्लंघन झाले आहे. मागील दोन वर्षांच्या काळात २३ जवान यामध्ये ठार झाले आहेत.

पाकिस्तानकडून छुपे युद्ध : पाकिस्तान एकीकडे शांतता आवश्यक असल्याचा आव आणतो तर दुसरीकडे मात्र छुपे युद्ध करतो आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या ढासळलेली स्थिती हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे, असे निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी म्हटले आहे.