16 February 2019

News Flash

….तेव्हा पाकिस्तान असेल सर्वाधिक अण्वस्त्रे बाळगणारा जगातील पाचवा देश

पाकिस्तानकडे सध्या १४० ते १५० अण्वस्त्रे असून निर्मितीचा हाच ट्रेंड कायम राहिला तर २०२५ पर्यंत पाकिस्तानकडे २२० ते २५० अण्वस्त्रांचा साठा असेल.

पाकिस्तानकडे सध्या १४० ते १५० अण्वस्त्रे असून निर्मितीचा हाच ट्रेंड कायम राहिला तर २०२५ पर्यंत पाकिस्तानकडे २२० ते २५० अण्वस्त्रांचा साठा असेल असा अंदाज एका अहवालातून वर्तवण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर यंत्रणेने १९९९ साली वर्तवलेल्या अंदाजापेक्षा पाकिस्तानकडे सध्या जास्त प्रमाणात अण्वस्त्रांचा साठा आहे. त्यावेळी अमेरिकेने २०२० पर्यंत पाकिस्तानकडे ६० ते ८० अण्वस्त्रे असतील असा अंदाज वर्तवला होता. पण सध्या हाच आकडा १४० ते १५० च्या घरात आहे.

सध्याचा ट्रेंड कायम राहिला तर २०२५ साली पाकिस्तानकडे २२० ते २५० अण्वस्त्रांचा साठा असेल. अशा परिस्थितीत पाकिस्तान सर्वाधिक अण्वस्त्रे बाळगणारा जगातील पाचवा देश असेल. एम. क्रिस्टेनसेन, रॉबर्ट ए नॉरीस आणि ज्युलिया डायमंड यांनी ‘पाकिस्तानी न्यूक्लियर फोर्स २०१८’ या आपल्या अहवालात हा अंदाज वर्तवला आहे.

मागच्या दशकभरात पाकिस्तानातील अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा आढावा घेताना परिस्थिती मोठया प्रमाणात बदलली आहे. सध्या पाकिस्तानातील अण्वस्त्रांची सुरक्षा अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. हे शस्त्र उद्या दहशतवाद्यांच्या हाती पडले तर मोठा अनर्थ ओढवू शकतो. पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांचा विस्तार झाला असून पुढच्या दहावर्षात पाकिस्तानात अण्वस्त्र साठा वाढणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तानी सैन्य आणि हवाई दलाच्या तळांवरील मोबाईल लाँचर्सचा उपग्रह छायाचित्रांद्वारे आढावा घेण्यात आला असून त्या आधारे अण्वस्त्र संख्येबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. भारताचे आव्हान लक्षात घेता पाकिस्तानने दीर्घ पल्ल्यापेक्षा छोटया पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित करण्यावर भर दिला आहे.

First Published on September 6, 2018 6:04 pm

Web Title: pakistan could be worlds fifth largest nuclear state