पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा अणवस्र हल्ल्याची भाषा केली आहे. मात्र याबरोबरच त्यांनी हे देखील मान्य केले की, पाकिस्तानचे जर भारताबरोबर पारंपारिक युद्ध झाले तर यात पाकिस्तानला पराभवास सामोरे जावे लागेल. शिवाय या सर्वांचे परिणाम भयानक असतील असेही त्यांनी म्हटले आहे.

काश्मीर मुद्यावरून भारताला अणवस्र हल्ल्याची धमकी दिल्याबद्दल अल जजीरा या वृत्तवाहिनीकडून विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना इम्रान खान बोलत होते.

यावेळी इम्रान खान यांनी हे देखील सांगितले की, या युद्धात पराभवाच्या छायेत असलेल्या देशाकडे केवळ दोनच पर्याय असतील ते म्हणजे एकतर त्याने आत्मसमर्पण करावे अन्यथा शेवट्च्या क्षणापर्यंत स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहवे. अशावेळी पाकिस्तान शेवटपर्यंत लढेल आणि हेच कारण आहे की, जेव्हा एखादा अणवस्रधारी देश शेवटच्या क्षणापर्यंत लढतो तेव्हा परिणाम भयावह असतात. म्हणूनच आम्ही संयुक्त राष्ट्राशी संपर्क साधला आहे व प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघनटेशी संपर्क साधत आहोत, जेणेकरून त्यांनी आता तरी या मुद्यावर पावलं उचलाचला हवीत. काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्यात आल्याबद्दल बोलताना इम्रान खान यांनी, भारताने काश्मीरवर अवैधरित्या कब्जा केला असल्याचा आरोप केला.

यावेळी ते हे देखील म्हणाले, मी असं म्हटलंय की पाकिस्तान कधीही अणुयुद्धाची सुरुवात करणार नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटणार नाही, असं मला वाटतं. युद्धाचे अनपेक्षित परिणाम दिसतात. व्हिएतनाम, इराकच्या युद्धांना बघा, त्या युद्धांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्या कदाचित युद्ध ज्यासाठी केले गेले त्याच्यापेक्षाही गंभीर आहेत.