मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकीउर रहमान लख्वी याला सहा वर्षांपूर्वी केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाकडून शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
इस्लमाबाद न्यायालयात झालेल्या सुनावरणीदरम्यान दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर लख्वीला जामीन मंजूर करण्यात आला मात्र, त्याच्यावर आणखी एक गुन्ह्याची नोंद असल्यामुळे लख्वीचा तुरूंगवास अद्यापही कायम आहे. येत्या १२ जानेवारी रोजी लख्वीच्या जामीनाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
सहा वर्षांपूर्वी महंमद अन्वर खान या अफगाणी व्यक्तीचे अपहरण केल्याचा आरोप लख्वीवर आहे. लख्वीवर असलेल्या आरोपानुसार सहा वर्षांपूर्वी लख्वीने महंमद अन्वर खान या अफगाणी व्यक्तीवर जिहादी होण्यासाठी दबाव आणला होता. मात्र, खानने नकार दिल्यामुळे लख्वीने त्याचे अपहरण केले.
लख्वी तरुंगात डांबून रहावा यासाठी त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात येत असल्याचा दावा लख्वीच्या वकिलाने न्यायालयात यावेळी केला. त्यावर प्रतिवादात लख्वीने अपहरण केल्याबाबतच्या तक्रारीची अजूनही चौकशी सुरू आहे आणि चौकशीसाठी लख्वी पोलिसांच्या कोठडीत असणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले. अखेर इस्लमाबाद न्यायालयाने आपल्या सुनावणीत लख्वीचा जामीन मंजूर केला परंतु, मुंबई हल्ल्यावरील खटला अजूनही सुरू असल्यामुळे सार्वजनिक शांततेच्या कलमाखाली लख्वीला तुरूंगातच रहावे लागणार आहे.