तीन आरोपींना राजद्रोहाच्या खटल्यात गोवण्याच्या विशेष लवादाच्या  निर्णयाला आव्हान देण्यात आल्यावरून पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरील खटल्याला विशेष लवादाने स्थगिती दिली आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान शौकत अझीझ, माजी सरन्यायाधीश अब्दुल हमीद डोगर व माजी कायदा मंत्री झहीद हमीद यांना मुशर्रफ यांच्याबरोबर राजद्रोहाच्या खटल्यात सहआरोपी केल्याबाबतच्या याचिकेची सुनावणी करताना मुशर्रफ यांच्याविरोधातील खटल्याला स्थगिती दिली.
तिघा सहआरोपींनी विशेष लवादाने या तिघांची नावे राजद्रोहाच्या खटल्यात समाविष्ट करण्याच्या निकालास आव्हान दिले होते. त्यावर न्या. अतार मिनाल्लाह यांनी सांगितले की, या याचिकांचे न्यायक्षेत्र ठरेपर्यंत खटल्याची पुढील कारवाई स्थगित ठेवण्यात येईल. यापुढील सुनावणी १५ फेब्रुवारीला होणार आहे. मुशर्रफ यांनी २००७ मध्ये देशात आणीबाणी घोषित करून कलम ६ अन्वये राज्यघटना निलंबित केली होती, त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. या आरोपाला मृत्युदंडाची शिक्षा आहे. मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये रक्तहीन क्रांती करून सत्ता बळकावली व नंतर त्यांनी २००८ पर्यंत राज्य केले. नंतर ते काही काळ इंग्लंड व संयुक्त अरब अमिरातीत होते व नंतर निवडणुकात सहभागी होण्यासाठी २०१३ मध्ये मायदेशी परत आले होते. सध्या ते तीन गुन्हेगारी खटल्यात जामिनावर सुटले असून मुलीबरोबर कराचीत राहतात. सरकारने त्यांना देश सोडून जाण्यास परवानगी नाकारली आहे.