पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ३१ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्याचे कारण देऊन सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने मुशर्रफ यांना ३१ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.
पाकिस्तानचे अध्यक्ष असताना २००७ मध्ये मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी लादली होती. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला २०१३ मध्ये दाखल करण्यात आला होता. तीन सदस्यांच्या विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना ३१ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीला स्वत: हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
देशद्रोहाचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते. मुशर्रफ यांनी आपण दोषी नसल्याचे म्हटले आहे. मंगळवारी होणाऱ्या चौकशीला मुशर्रफ हजर राहिले नाहीत. त्यांचे वकील फैझल चौधरी यांनी न्यायालयास सांगितले की, मुशर्रफ यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुशर्रफ यांना जमीन मंजूर करण्यात आला असून सुनावणीला हजर न राहण्याची सवलत त्यांना आहे, असेही चौधरी म्हणाले.
मुशर्रफ सुनावणीला हजर राहणार नाहीत, ही बाब चौधरी यांनी सुनावणीच्या तारखेपूर्वी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे क्रमप्राप्त होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची सुनावणी दररोज घ्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली, मात्र न्यायालयाने ती त्वरित मान्य केली नाही.