भारत सरकारचा काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अनेक वेळा हे कलम रद्द करण्याच्या चर्चा करण्यात आल्या होत्या, पण अखेर २०१९ मध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयावरून पाकिस्तानच्या पोटात दुखू लागले. पाकिस्तानचे धाबे दणाणल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान, इतर केंद्रीय मंत्री, काही पाकिस्तानी सेलिब्रिटी यांनी या मुद्द्यावरून आपली टोकाची मतं मांडली. तशातच आता पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनेही या मुद्द्यावर एक दर्पोक्ती केली आहे.

“भारताचे पंतप्रधान मोदी यांना आम्ही अनेकदा ताकीद दिली आहे. भारतातील लोक हे भित्रे आहेत. पण आमच्याकडे जी अण्वस्त्रे आहेत, ती आम्ही केवळ दाखवण्यासाठी ठेवलेली नाहीत. आम्ही केवळ संधीची वाट पाहत आहोत. आम्ही वापर करण्यासाठीच ती अण्वस्त्र घेतलेली आहेत. त्यामुळे संधी मिळताच अण्वस्त्र वापरून भारताला साफ करून टाकू”, अशी दर्पोक्ती जावेद मियांदादने केली आहे.

“जर तुमच्याकडे अण्वस्त्रे आहेत, तर त्याचा वापर नक्कीच करायला हवा. संपूर्ण जगभरात असा नियम आहे की देशाच्या सुरक्षेसाठी तुम्ही अण्वस्त्रांचा साठा करू शकता. जर तुम्हाला माहिती असेल की तुमच्यावर हल्ला होणार आहे तर तुम्ही नुसतेच मरू नका. शत्रूला ठार करून तुम्ही शेवटचा श्वास घ्या. जेव्हा शत्रूराष्ट्राच्या नागरिकांचे जेव्हा जीव जातील, तेव्हा त्यांना इतरांच्या जीवाची किंमत समजेल”, असेही मियांदाद म्हणाला आहे.

या आधीही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने या मुद्द्यावर ट्विट केले होते. पण माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गाैतम गंभीर याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या शोएब अख्तरनेही या मुद्द्यावर भाष्य केले होते, पण चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.