पाकिस्तानला दहशतवादाचा फटका बसत असून याचा देशातील सैनिकांनी धीराने सामना केला. सीमेवरही सैनिकांनी देशासाठी रक्त सांडले असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्वांचा बदला घेऊ, अशी धमकीच पाकिस्तानचे लष्कप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी दिली.

पाकिस्तानी लष्कराचा गुरुवारी रावळपिंडीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारताचे थेट नाव न घेता बाजवा यांनी धमकी दिली. ते म्हणाले, ६ सप्टेंबर १९६५ हा दिवस पाकिस्तानाच्या इतिहासात महत्त्वाचा दिवस आहे. या युद्धातून आमचे सैनिक आजही प्रेरणा घेतात. १९६५ आणि ७१ च्या युद्धातून आम्ही खूप शिकलो, असे त्यांनी सांगितले.

जगभरात दहशतवादी कारवाया वाढत गेल्या आणि याचा फटका पाकिस्तानलाही बसला. देशात दहशतवादी हल्ले झाले, देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. यात हजारो सैनिकांचे प्राण गेले आणि जखमी झाले. या सर्वांच्या बलिदानाला पाकिस्तान कधीच विसरु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सीमेवर बलिदान देणाऱ्या जवानांचे रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही. याचा बदला घेऊ, असे त्यांनी सांगितले. सैन्याचे काम अजून संपलेले नाही. युद्ध अजूनही सुरुच आहे. देशात शांतता प्रस्तापित करण्यासह देशाचा विकास करायचा आहे. जेणेकरुन पुन्हा शत्रूराष्ट्र देशाकडे डोळे वटारुन बघण्याची हिंमत करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी चर्चा आवश्यक आहे असे म्हटले असतानाच पाकच्या लष्करप्रमुखांनी असे विधान केल्याने पाकिस्तानची दुटप्पी भूमिका समोर आले आहे.